सलमान खानने ‘कॉफी विथ करण’ सीझन ९ च्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्याने प्रेम, मुलं, काम आणि बऱ्याच गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केलं. या एपिसोडदरम्यान सलमानने त्याच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची शक्यता फेटाळली. तसेच आपल्या आयुष्यातील काही गुपितं स्वतःबरोबर ‘कबरीत’ घेऊन जाईल, असं त्याने सांगितलं. तर कोणालाही प्रेमाचा सल्ला देण्यासाठी आपण चुकीची व्यक्ती असल्याचं तो म्हणाला.
करिश्मा कपूरने तिचा ‘निश्चय’ चित्रपटातील सह-कलाकार सलमान खानला त्याच्या आयुष्यावर आधारित काल्पनिक चित्रपटासाठी दिग्दर्शक निवडायला सांगितलं. सलमानने त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंसाठी चार दिग्दर्शकांची नावे घेतली. पण त्याच वेळी त्याने स्पष्ट केलं की तो कधीही कोणालाही आपल्या आयुष्यावर बायोपिक बनवू देणार नाही. “जर माझ्या आयुष्यावर कॉमेडी चित्रपट बनवायचा असेल, तर डेव्हिड धवन. जर ट्रॅजिक लव्ह स्टोरी बनवायची असेल, तर संजय लीला भन्साळी.”
माझ्या आयुष्यावर कधीच बायोपिक बनणार नाही – सलमान खान
तो पुढे म्हणाला, “एक अतिशय सुंदर प्रेमकथा बनवायची असेल, तर सूरज बडजात्या. आणि माझ्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींवर आधारित ॲक्शन लव्ह स्टोरी सिनेमा बनवायचा असेल, तर कबीर खान. पण माझ्या आयुष्यावर बायोपिक कधीच बनणार नाही. माझं आयुष्य माझ्याबरोबर कबरीत जाईल.” करण जोहरने सलमानला त्याच्या लव्हस्टोरीबद्दल विचारलं, पण त्याने त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं.
रॅपिड-फायर राऊंडमध्ये करिश्माने सलमानला त्याच्या लव्ह लाईफ वर्णन करण्यासाठी काही चित्रपटांच्या नावांचे पर्याय दिले. त्यावर सलमान म्हणाला, “‘तुमको ना भूल पाएंगे’ हे येणारच नाही, कारण प्रत्येकजण प्रत्येकाला विसरून जातो. जर तुम्हाला प्रेमात पडायचं असेल, तर त्याचं कारण असतं आणि ते वारंवार समोर येत असतं.”
सलमान पुढे म्हणाला, “त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. ‘लकी: नो टाईम फॉर लव्ह’ हा पर्याय योग्य नाही, कारण प्रेमासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. वेळ मिळाला आहे आणि पुढेही मिळेल. ‘सनम बेवफा’ याबद्दल आता बोलू नका. मी फक्त माझ्या पहिल्या चित्रपटाचं शीर्षक निवडेन ‘मैने प्यार किया’.”
‘कॉफी विथ करण’मधील चर्चेदरम्यान प्रेमाचा विषयही निघाला. करिश्मा कपूरने विचारलं, “जर त्याचे पुतणे निर्वाण, अरहान किंवा अयान त्याच्याकडे रिलेशनशिपच्या सल्ल्यासाठी आले, तर…” सलमान खानने तिचं वाक्य मध्येच तोडलं आणि म्हणाला, “तुम्ही चुकीच्या माणसाकडे आला आहात. पण मी त्यांना असंही म्हणणार नाही की तुमच्या वडिलांकडे जा.”
