Salman Khan Alliance : प्राइमवरील ‘अलायन्स’ हा शो जोरदार चर्चेमध्ये आला आहे. या शोमध्ये सोहेल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून त्याला भेटण्यासाठी सलमान खान शोमध्ये दाखल झाला आहे. सलमान खान ‘अलायन्स’मध्ये आल्यामुळे या शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोहेल खान सहभागी झाल्यापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेमध्ये आला आहे. सोहेल खानसह त्याची एक्स पत्नी सीमा सजदेहदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच दोघे एका शोमध्ये आल्याने त्यांच्या नात्यावर खूप चर्चा रंगली. आता शोमध्ये सलमान खान आल्यानंतर त्याने सीमा व सोहेलच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
सोहेल खान शोमध्ये सहभागी झाल्यापासून सलमान खान शोमध्ये कधी येणार याची चर्चा रंगली होती. अखेर धाकटा भाऊ सोहेलला भेटण्यासाठी सलमान खान आला आहे. ‘अलायन्स’मधील हेडक्वार्टरमध्ये सलमान आल्याचे अनेक प्रोमो समोर आले आहेत. यामध्ये भाईजान अचानक आल्याचे पाहून सर्व स्पर्धक आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले. सलमानने आल्या आल्या भावाला घठ्ठ मिठी मारली, यावेळी त्या दोघांमधील प्रेम दिसून आले. सोहेलने भावासमोर त्याच्या सर्व भावना व्यक्त केल्या. सलमान व सोहेलमधील भावनिक नातं यावेळी दिसून आले.
सलमान खाननं ‘अलायन्स’मध्ये केला रितेश देशमुखचा उल्लेख
सलमान खाननं अभिनेता रितेश देशमुखचं नाव घेऊन मजेशीरपणे वक्तव्य केल्याचं एका प्रोमोमध्ये दिसून आले. सलमान म्हणतो, “मला वाटतं रितेश देशमुखची नोकरी धोक्यात आली आहे.” सलमाननं हे वक्तव्य नेमकं कोणत्या संदर्भात केलं ते अजून समोर आलेलं नाही; पण सलमान खाननं रितेश देशमुखचा मस्करीत उल्लेख केल्याचं दिसून आले आहे. सलमानचे हे वक्तव्य नेमके कशा संदर्भात होते, याचा खुलासा आता एपिसोड रिलीज झाल्यानंतर होईल. पण, त्यापूर्वी सलमानचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने सीमा सजदेह हिचा उल्लेख केला आहे.
नवीन प्रोमोमध्ये सलमान खानने सीमा सजदेहचा उल्लेख केला असून त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. सलमान खानने सोहेलला त्याच्या एक्स पत्नीबद्दल आणि घटस्फोटाबद्दल विचारलं. सलमान म्हणाला, “तू अजूनही सीमाचं ऐकतोयस का? हे बोलावं की नाही, असा विचार करत होतो… पण आता बोलतो. माझ्या भावाने घटस्फोटाचा सगळा दोष स्वतःवर घेतला. पण एक भाऊ म्हणून मला माहीत आहे की, त्यानं हे नातं टिकवण्यासाठी किती प्रयत्न केले होते, तो हे सगळं मनात दाबून ठेवत होता.”
सोहेल खानने यापूर्वी शोमध्ये त्याचा आणि सीमाचा घटस्फोट का झाला होता याबद्दल सांगितलेले. तो म्हणालेला, “त्यावेळी माझी वेळ चांगली नव्हती आणि माझी मानसिक स्थितीही वाईट होती. माझ्या वागण्यामुळे मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो तिला गमावलं. पण, सीमा माझ्या दोन सुंदर मुलांची आई आहे, त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमापेक्षा जास्त आदर आहे. हा शो माझ्यासाठी नेहमीच खास राहील. जरी आम्ही वेगळं झालो असलो तरी या शोनं आम्हाला पुन्हा एकमेकांशी बोलण्याची संधी दिली. आमच्यातील एक नातं कुठेतरी तुटलं होतं आणि या शोमुळे आम्हाला ते पुन्हा जोडता आलं.”
सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. सीमा व सोहेल यांना दोन मुलं असून निर्वाण व योहान अशी त्यांची नावं आहेत. मात्र, तब्बल दोन दशकं संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सीमा व सोहेल यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. अलायन्स या शोमध्ये पुन्हा हे दोघे एकत्र आले होते. आता सलमान खान भेटायला आल्यानंतर त्याने सोहेल खानला सीमाबद्दल विचारलं आहे.
