India’s Got Latent season 2 episode 2 : कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’ शो सुरू झाला असून, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून होते. त्यानंतर आता दुसरा एपिसोडही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी कोणताही सेलिब्रिटी नाही, तर उत्तर प्रदेश पोलिसातील एक कॉन्स्टेबल चर्चेत आला आहे. त्यांचा भन्नाट परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, समय रैनाची त्यांनी फिरकी घेतली आहे. पोलीस गणवेशात स्टेजवर आलेल्या या स्पर्धकाने समय रैनालाही क्षणभर गोंधळात टाकले आणि त्यानंतर प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच या पोलीस कॉन्स्टेबलने गाणे गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये हर्ष लिंबाचिया, किकू शारदा व चंदन प्रभाकर पाहुणे म्हणून पॅनेलमध्ये सामील झाले आहेत. नेहमीप्रमाणे समयने आपल्या हटक्या स्टाईलने हास्यविनोद केले असून, काही स्पर्धकांची हलक्याफुलक्या शैलीत फिरकी घेतली. या शोला यूट्यूबवर १४ तासांत १३ दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. दुसऱ्या एपिसोडमध्ये अरुणाचल प्रदेशातील एक स्पर्धक सहभागी झाली होती. जैनी कामकी, असे तिचे नाव असून तिच्या अभिनय आणि उत्तरांवर समय रैनासह संपूर्ण पॅनेल खूप प्रभावित झाले होते. समयनेही तिचे कौतुक केले. पण दुसऱ्या एपिसोडमध्ये सर्वांत जास्त चर्चा ही पोलिसाच्या पात्राची रंगली आहे. कारण- ही फक्त भूमिका नव्हती, तर खरंच ती व्यक्ती पोलीस म्हणून काम करतेय. उत्तर प्रदेश पोलिसातील पोलीस कॉन्स्टेबल कपिल दिनकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

समय रैनाच्या शोमध्ये पुन्हा आले पोलीस

कपिल दिनकर हे स्टेजकडे त्यांची कला सादर करण्यासाठी येत असताना पोलिसांच्या गणवेशात आले होते. हे पाहून समय म्हणाला, “सर, तो तर मागचा सीझन होता.” त्यावर कपिल यांनी, “पुन्हा सुरू केलं हे, मागच्या वेळी बंद करून मन नाही भरलं का?” असा पलटवार केला. कपिल यांनी मंचावर कला सादर केली असून, त्यांनी गाणेही गायले. त्यांचे गाणे ऐकून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. हे गाणे त्यांनी स्वतःच लिहिले असून, स्वतःच त्याला संगीत दिल्याचा खुलासा कपिल यांनी केला.

कपिल दिनकर उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत

कपिल यांनी कला सादर करताना पोलिसांचा गणवेश घातला होता. ते खरंच पोलीस आहेत, याबद्दल समय रैनाला कोणीतीही कल्पना नव्हती, यावेळी समयने असा पोलिसांचा युनिफॉर्म घालून तुम्ही येऊ शकत नाही, असे सांगितले. त्यावर कपिलने ते खरंच पोलीस असल्याचे सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. कपिल यांनी खुलासा केला की, ते उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यावर समय म्हणाला, “अरे, आमच्याकडे चक्क पोलीसवाले परफॉर्म करायला आले आहेत. यावर विश्वासच बसत नाहीये,” अशी प्रतिक्रिया देत समयने कपिलजवळ जात त्यांना चहा ऑफर केला. त्याच्या या कृतीने उपस्थित सर्व जण जोरजोरात हसू लागले.

कोण आहेत कपिल दिनकर?

कपिल दिनकर यांची उत्तर प्रदेश पोलिसांत २०२१ साली कॉन्स्टेबलपदी निवड झाली. त्यांच्या या प्रवासाबद्दल कपिल म्हणाले, “पोलीस अधिकारी बनणे हे आईचे स्वप्न होते आणि हे स्वप्न पूर्ण केल्यामुळे खूप अभिमान वाटतो. पोलीस सेवा हे प्रोफेशन असले तरी संगीत ही नेहमीच आवड राहिली आहे. मी विभागातील अशी एकमेव व्यक्ती आहे, ज्याला संगीत सादर करण्याची परवानगी आहे,” असे कपिल यांनी सांगितले असून, त्यांच्या कलेमुळे लेटेंटमधील पॅनेल प्रभावित झाले आहे.