Samay Raina show Tanzanian Marathi Song : समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट २’ शोचा नवीन एपिसोड सोमवारी रिलीज झाला. त्यामध्ये समयबरोबर रॅपर बादशाह, कॉमेडियन हर्ष लिंबाचिया व यूट्यूबर सौरव जोशी हे पॅनेलमध्ये दिसून आले आहेत. सध्या हा एपिसोड पैसे भरणाऱ्या सशुल्क प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये एक टांझानिया देशातील तरुणानं लक्ष वेधलं आहे. त्यानं शोमध्ये चक्क मराठी भाषेमध्ये गाणं गायलं आहे.
समय रैनाच्या या नव्या बोनस एपिसोडमध्ये टांझानियामधील फैसल नावाचा तरुण सहभागी झाला होता. त्यांच्या गप्पा, गाणी आणि संवाद यामुळे त्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. दुसऱ्या देशातील असूनही फैसलनं भारताविषयी व्यक्त केलेलं प्रेम आणि बॉलीवूडची त्याची आवड पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे त्याला भारतातील एक दोन नाही तर अनेक भाषा येत असल्याचं फैसलनं सांगितलं. त्यानं प्रेक्षकांशी मराठीमध्ये संवाद साधला असून, खास मराठी गाणं गायलं आहे.
टांझानियातील तरुणानं गायलं मराठी गाणं
सोशल मीडियावर फैसलचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, त्याचा परदेशी व्यक्ती असूनही त्याच्यामध्ये असलेला भारतीय अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फैसल म्हणाला, “मला हरयाणवी, पंजाबी, हिंदी, मराठी, तमीळ या भाषा येतात,” यावर समयनं विचारलं, तुला मराठी येतंय का?’ तर फैसल म्हणाला, “मला बोलता येत नाही, पण गाता येतं.” त्यानंतर फैसलने ‘मराठमोळी थोडीशी साधीभोळी…’असे बोल असलेले ‘नखरेवाली’ हे गाणं गायलं. अगदी तालासुरामध्ये फैसलनं हे मराठी गाणं गायल्यानं प्रेक्षकांसह सर्व पॅनेलनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
फैसलच्या मराठीवर शिव ठाकरे काय म्हणाला?
फैसलच्या हा मराठी गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. टांझानियातील असूनही त्यानं मराठीमध्ये गाणं गायल्यानं नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे. व्हायरल व्हिडीओवर ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता शिव ठाकरेनेदेखील कमेंट करीत त्याचं कौतुक केलं आहे. रेड हार्ट इमोजीसह फैसलच्या मराठी गाण्यावर शिव ठाकरेनं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर मराठी अभिनेता आयुष साळुंखे, निक्स शिंदे यांसह नेटकऱ्यांनी या टांझानियातून आलेल्या तरुणाचं कौतुक केलं आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट २’ मध्ये गाजली मराठी
दरम्यान, इंडियाज गॉट लेंटंट २च्या पहिल्या एपिसोडमध्ये मराठी कलाकार सुकृत देव सहभागी झाला होता. त्याचा अभिनय आणि त्याची कला पाहून सुकृतचं जोरदार कौतुक झालं होतं. मराठी नाटकांमध्ये अभिनय करणाऱ्या सुकृतनं पहिल्या एपिसोडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याच्यावर आलिया भट्ट, समय रैना व शर्वरी वाघने कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता टांझानियातील तरुणानं मराठी गाणं गाऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
