Vadh 2 Movie Trending On OTT : ओटीटीवर दररोज विविध विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होत असतात. यात रोमँटिक, थ्रिलर, क्राईम, साय-फाय आणि हॉरर कॉमेडी अशा अनेक प्रकारच्या सिनेमांचा समावेश असतो. मात्र, ‘क्राईम थ्रिलर’ हा असा विषय आहे जो प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालतो. अशाच एका क्राईम थ्रिलर चित्रपटाची ओटीटीवर सध्या चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांपासून ओटीटीपर्यंत ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ची जोरदार चर्चा होती. मात्र, या आठवड्यात ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. ओटीटीवर एका क्राईम थ्रिलर चित्रपटाने ओटीटीवर अव्वल स्थान पटकावले आहे. ज्याचे नाव आहे ‘वध-२’.

नुकताच नेटफ्लिक्सवर ‘वध-२’ प्रदर्शित झाला आहे आणि ओटीटीवर येताच या चित्रपटाने अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या भागामुळे चित्रपटाचा पहिला भागही नेटफ्लिक्सवर पुन्हा एकदा ट्रेंड होऊ लागला आहे.

‘वध-२’ या चित्रपटाचा पहिला भाग २०२२ मध्ये आला होता, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ४ वर्षांनंतर याच्या सीक्वेललाही प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ‘वध २’ ची कथा तुरुंगातून गायब झालेल्या एका कैद्याच्या गूढ प्रकरणावर आधारित आहे. संजय मिश्रा (एक निवृत्त होणारे गार्ड) आणि नीना गुप्ता (एक कैदी) यांच्यातील हळवे नाते आणि तुरुंगात झालेल्या एका संशयास्पद खुनाभोवती चित्रपटाची कथा फिरते.

आता हा खून कधी, का आणि कसा झाला? त्यानंतर पुढे मृतदेहाचे काय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. जसपाल सिंह संधू यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी ‘लव फिल्म्स’च्या बॅनरने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा ‘वध २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा चित्रपट आपले बजेटही वसूल करू शकला नव्हता. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट १० कोटी रुपये होते, पण त्याने केवळ ३.६१ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, ओटीटीवर रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे.