Sankalp OTT Trending News: ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन सीरिज येत असतात, पण त्यातील काहीच सीरिज ट्रेंडमध्ये येतात. कारण त्या सीरिज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. नुकतीच प्रदर्शित झालेली एक ‘पॉलिटिकल ड्रामा’ सीरिज सध्या अमेझॉन प्राइम व्हिडीओवर राज्य करत आहे. इतकंच नाही तर ही सीरिज टॉप १० च्या यादीत ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रदर्शित होऊन २० दिवस उलटले तरी ही सीरिज टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये आपले स्थान टिकवून आहे.
या सीरिजमध्ये एकूण १० भाग असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विशेष म्हणजे प्रदर्शित होऊन २० दिवस उलटल्यानंतरही ही सीरिज प्रेक्षकांसाठी अजूनही ट्रेंडिंग आहे, त्यामुळे तुम्ही ती पाहिली नसेल तर या वीकेंडला पाहू शकता.
ही सीरिज कोणती?
आम्ही ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत तिचे नाव ‘संकल्प’ (Sankalp) आहे. यात नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ११ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केली आहे. नाना पाटेकर यांच्याबरोबर झीशान अय्यूब, कुब्रा सैत, संजय कपूर आणि नीरज काबी यांसारख्या उत्तम कलाकारांनी काम केलं आहे.
संकल्प सीरिजची कथा काय आहे?
ही एक भारतीय सामाजिक-राजकीय विषयावर भाष्य करणारी सीरिज आहे. सत्ता केवळ निवडणुकांद्वारेच नाही, तर योग्य मार्गदर्शन आणि नियंत्रणाद्वारे कशी मिळवली जाते, हे यात दाखवले आहे. प्राचीन चाणक्य-चंद्रगुप्त कथेवरून प्रेरणा घेऊन, आधुनिक भारतातील राजकीय डावपेच यात नव्या रूपात मांडले आहेत. जिथे युद्धाच्या मैदाऐवजी क्लासरूम आहेत आणि सैनिकांची जागा अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमागे कन्हैयालालचा ३० वर्षांपूर्वीचा बदल्याचा एक जुना कट असतो. स्वतःच्या फायद्यासाठी आणि सूड घेण्यासाठी तो क्लासरूमचा वापर युद्धाच्या मैदानासारखा करतो. आधुनिक काळात तलवारींऐवजी बुद्धीचा आणि सैनिकांऐवजी अधिकाऱ्यांचा वापर करून राजकारण कसे केले जाते, हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.
जर तुम्हाला राजकारण, प्रशासकीय यंत्रणा आणि माईंड गेम्स पाहायला आवडत असतील, तर ही सीरिज तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. प्रकाश झा ‘गंगाजल’ आणि ‘राजकारण’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. नाना पाटेकर यांनी ‘कन्हैयालाल’ या भूमिकेत जीव ओतला आहे. त्यांचा दरारा आणि संवादफेक प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सोबतच झीशान अय्यूब आणि कुब्रा सैत यांचा अभिनयही उत्तम झाला आहे. ही कथा केवळ निवडणुकांवर आधारित नसून, शिक्षणाद्वारे आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने सत्ता कशी मिळवली जाते, यावर भाष्य करते.
प्राइम व्हिडीओवर पाहा सीरिज
‘संकल्प’ या वेब सीरिजमध्ये एकूण १० भाग आहेत. प्रत्येक भाग साधारण ४० ते ५० मिनिटांचा असून कथेची पकड शेवटपर्यंत कायम राहते. ही सीरिज तुम्ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ही सीरिज ११ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाली असून सध्या ती टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. दमदार अभिनय, प्रभावी संवाद आणि सत्तेचा खेळ आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही एक उत्तम मेजवानी आहे.
