गेल्या काही वर्षांपासून ओटीटी आणि वेब सीरिजची प्रचंड क्रेझ वाढली आहे. ओटीटीवर विविध जॉनरच्या सीरिज प्रदर्शित होत असतात. काही सीरिजचे तर कित्येक सीझनसुद्धे आले आहेत परंतु, तरीसुद्धा त्यांची क्रेझ काही कमी झालेली नाही. अशातच आता ओटीटीवर सद्या एका वेब सीरिजची खूप चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे या सीरिजच्या सर्व एपिसोडला जबरदस्त रेटिंगसुद्धा आहे.
ओटीटीवर सध्या मोठ्या प्रमाणात पाहिली जात असलेली ही सीरिज फक्त पाच भागांची असून ती २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय सीरिजचा दुसरा भाग आहे. आता हा दुसरा सीझनसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. या सीरिजचं नाव आहे ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन सीझन २’. टीवीएफच्या बॅनरखाली बनलेल्या आणि अंबरीश वर्मा दिग्दर्शित या सीरिजचा पहिला भाग फक्त ५ एपिसोडचा होता परंतु, आयएमडीबीवर या सीरिजला चांगली रेटिंग आहे.
तब्बल तीन वर्षांनंतर, म्हणजेच मे २०२६ मध्ये ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’चा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि त्याने पहिल्या सीझनपेक्षाही अधिक यश मिळवलं. प्रदर्शित झाल्यापासूनच ही वेबसीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, ही जगातील सर्वाधिक आयएमडीबी रेटिंग मिळालेल्या वेबसीरिजपैकी एक ठरली आहे. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडला आयएमडीबीवर वर ९.७ इतकं रेटिंग मिळाले आहे.
‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’च्या पहिल्या सीझनमधील पाचही एपिसोडला ९.५, ९.४ असे रेटिंग्स मिळाले होते तर आताही दुसऱ्या भागालाही चांगले रेटिंग्स मिळाले आहेत. दुसऱ्या सीझनच्या पहिल्या चार एपिसोडला ९.७ इतके रेटिंग्स मिळाले असून पाचव्या एपिसोडला९.८ इतके रेटिंग मिळालं आहे.
सीरिजची कथा काय आहे?
‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ची कथा आपल्या स्वप्नांसाठी झपाटलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते. हळूहळू उलगडणाऱ्या त्यांच्या प्रवासातून संघर्ष, कठोर व्यवस्था आणि यशासाठी मोजावी लागणारी मोठी किंमत यांसारखे विषय प्रभावीपणे मांडले आहेत. या वेबसीरिजमध्ये परमवीर सिंह, अंबरीश वर्मा, विजयंत कोहली, अभिषेक चौहान आणि किरणदीप कौर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
