Thriller Movie Trending No 1 on OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. गेल्या काही दिवसांपासून ‘धुरंधर २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. शिवाय याचा पहिला भाग म्हणजेच ‘धुरंधर’ हा चित्रपटदेखील ओटीटीवर टॉपला होता. मात्र, आता त्याची क्रेझ थोडी कमी होताना दिसत आहे.
नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमधील ‘धुरंधर’ हा चित्रपट टॉप-५ मध्ये आला आहे. अशातच आता आणखी एक चित्रपट ओटीटीवर आला आहे, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण आता हा चित्रपट ओटीटीवर येताच थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो एक थ्रिलर चित्रपट आहे. विशेष म्हणजे यात अशा एका स्टार किडची मुख्य भूमिका आहे, जिने आतापर्यंत एकही हिट चित्रपट दिलेला नाही. तिने विक्रांत मेस्सीबरोबर आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यानंतर तिचा हा दुसरा चित्रपट आला आणि तोदेखील बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. मात्र, तिच्या दोन्ही चित्रपटांची खास गोष्ट अशी की, थिएटरमध्ये चालले नसले तरी ओटीटीवर त्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिचा तिसरा चित्रपटसुद्धा ओटीटीवर ट्रेंडमध्ये आहे.
नेटफ्लिक्सवर सध्या शनाया कपूरचा ‘तू या मैं’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. याबद्दल अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीसुद्धा शेअर केली आहे. या चित्रपटात शनायासह आदर्श गौरव हा अभिनेताही मुख्य भूमिकेत आहे. बेजॉय नाम्बियार यांनी तू या मैं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘तू या मैं’ ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये

बॉक्स ऑफिसवर शनाया कपूरचा ‘तू या मैं’ हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाला बजेटचे पैसेदेखील वसूल करता आला नाही. या चित्रपटाने भारतात एकूण ८.४७ कोटींची कमाई केली होती. शनायाचा हा सलग दुसरा फ्लॉप चित्रपट आहे. याआधी तिने विक्रांत मेस्सीबरोबर ‘आंखों की गुस्ताखियां’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटातून पदार्पण केले होते, मात्र तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. पण आता ओटीटीवर मात्र शनायाने बाजी मारली आहे.
‘तू या मैं’ची कथा काय आहे?
चित्रपटाची कथा ‘आला फ्लोपारा’ आणि ‘मिस वॅनिटी’ या दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सभोवती फिरते. कथेमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. ही संपूर्ण कथा एका स्विमिंग पूल आणि दोन मगरींच्या भोवती गुंफलेली आहे. या मगरींपासून मुख्य नायक आणि नायिका स्वत:चा बचाव कसा करतात? यात त्यांच्यासमोर काय आव्हान येतात, हे पाहायला मिळतं.
