Kairee Releasing on OTT : ओटीटीमुळे प्रेक्षकांना अगदी घरबसल्या अनेक चित्रपटांचा आस्वाद घेता येतो. सिनेमागृहांत न चाललेले किंवा कमी चाललेले सिनेमे काही दिवसांतच ओटीटीवर येतात. त्यामुळे सिनेमागृहांत बघता न आलेले सिनेमे प्रेक्षकांना ओटीटीद्वारे पाहता येतात. असाच एक मराठी सिनेमा आता ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शशांक केतकर, सायली संजीव व सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कैरी’ सिनेमा गेल्या महिन्यात सिनेमागृहांत रिलीज झाला होता. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं आता हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. शशांक केतकर, सायली संजीव व सिद्धार्थ जाधव यांचा ‘कैरी’ सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी माध्यमावर पाहता येईल, चला जाणून घेऊ…

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर एका आंबट-गोड प्रवासाची कहाणी प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि शंतनू रोडे दिग्दर्शित ‘कैरी’ हा चित्रपट १४ जानेवारीला अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. १२ डिसेंबर २०२५ रोजी ‘कैरी’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता; पण या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अशातच सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होत आहे.

‘कैरी’ सिनेमाबद्दल थोडक्यात…

लंडनमध्ये चित्रित झालेला ‘कैरी’ हा चित्रपट एका गावातील साध्या महिलेची (सायली संजीव) कथा सांगतो. नवऱ्याबरोबर (शशांक केतकर) बाहेरच्या शहरात आल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. त्यात नवरा अचानक बेपत्ता झाल्यानंतर अपरिचित शहरात एकटी पडलेली ही महिला अनेक सामाजिक आणि भावनिक अडचणींना सामोरी जाते. नवऱ्याचा शोध घेत असताना ती स्वतःला ओळखण्याचा आणि खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास करते.

सायली संजीवने संयमी आणि भावपूर्ण अभिनय करीत या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. तिच्या अभिनयातून शांत, पण एका खंबीर स्त्रीची प्रतिमा प्रभावीपणे उभी राहते. या चित्रपटात तिच्यासह सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव व शशांक केतकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आधुनिक विषयांवर भाष्य करीत, ‘कैरी’ आजच्या मराठी सिनेमाचं बदलतं स्वरूप दाखवतो.

दरम्यान, ‘कैरी’ सिनेमाचं दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केलं आहे; तर नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर व निनाद बट्टीन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणे शक्य झाले नसेल, त्यांना हा सिनेमा आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. १४ जानेवारीपासून घरबसल्या हा सिनेमा अल्ट्रा झकास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.