Shekhar Home Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सस्पेन्स, रहस्य आणि थराराने नटलेल्या वेब सीरिजची क्रेझ सतत वाढत आहे. तुम्ही जर विकेंडला पाहण्यासाठी एका उत्तम थ्रिलरच्या शोधात असाल, तर ‘शेखर होम’ ही वेब सीरिज तुमच्यासाठी परफेक्ट चॉईस ठरू शकते. दोन वर्षांपूर्वी जिओ हॉटस्टारवर रिलीज झालेली ही सीरिज आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ही ६ एपिसोड्सची सीरिज इतकी रंजक आहे की एकदा पाहायला सुरू केल्यावर स्क्रीनवरून तुमची नजर हटणार नाही. ‘शेखर होम’ ही सीरिज खूपच साधी आहे, पण त्यातील रंजक ट्विस्ट पाहून तुमचं मनोरंजन होईल.

सर आर्थर कोनन डॉयल यांच्या ‘शरलॉक होम्स’ या  गुप्तहेराची जगाला १८८७ मध्ये पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर हॉलीवूडमध्ये यावर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज तयार झाल्या. बॉलीवूडमध्येही यावर काही प्रयत्न झाले. पण त्यापैकी ओटीटीरील या सीरिजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

‘शेखर होम’ वेब सीरिजची कथा

या वेब सीरिजची कथा १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बंगालमधील एका काल्पनिक ‘लोनपूर’ नावाच्या शहरात घडताना दाखवली आहे. इथे रहस्यमयी आणि तल्लख बुद्धिमत्तेचा गुप्तहेर शेखर होम (के के मेनन) राहतो. योगायोगाने त्याच्याबरोबर एक निवृत्त आर्मी डॉक्टर जयव्रत सैनी (रणवीर शौरी) हे रूममेट म्हणून राहू लागतो. तो ‘डॉ. वॉटसन’प्रमाणे त्याचा साथीदार बनतो. दोघे मिळून त्या भागातील विविध गूढ प्रकरणाचा उलगडा करतात. हत्या, ब्लॅकमेलिंग, गावातील घोटाळे, बँकेवरील दरोडे आणि अगदी अलौकिक वाटणाऱ्या घटनांचाही ते छडा लावतात. संपूर्ण सीझन तंत्रज्ञानापूर्वीच्या काळावर आधारित आहे, कारण त्यावेळी मोबाईल आणि इंटरनेट नव्हते. त्यामुळे फक्त तीक्ष्ण नजर आणि तर्काच्या जोरावरच प्रकरणं सोडवली जातात.

सीरिजमधील इतर कलाकार

के के मेनन यांनी ‘शेखर होम’ची भूमिका अगदी उत्तम साकारली आहे. रणवीर शौरीने साकारलेला जयव्रत सैनी हा शांत, व्यावहारिक आणि समतोल राखणारा साथीदार दाखवला आहे. रसिका दुगलने ‘इराबती अध्यो’ (आयरन अॅडलरपासून प्रेरित) हे रहस्यमयी आणि आकर्षक पात्र साकारलं आहे. यात कीर्ती कुल्हारी, रुद्रनील घोष आणि कौशिक सेन मृण्मय यांच्याही भूमिका आहेत.

या सीरिजचे निर्माते-दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी आणि रोहन सिप्पी आहेत. आहेत. याची निर्मिती ‘बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडिया’ने केली आहे. ही सीरीज शरलॉक होम्सच्या कथांवर आधारित आहे, पण भारतीय संदर्भ, बंगाली वातावरण आणि हलके-फुलके विनोद यामुळे ती खूप रंजक बनते आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवते.