Shilpa Shinde on Shivangi Joshi: मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे ही लॉक अप २ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. शिल्पा शोमध्ये सहभागी झाल्यापासून तिची वक्तव्ये आणि भांडणे यांमुळे ती चर्चेमध्ये आली आहे. खोट्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा खुलासा केल्यामुळे चर्चेत असलेल्या शिल्पाने आता ‘लॉक अप’मध्ये आक्रमक खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. शिल्पा शिंदेने अभिनेत्री शिवांगी जोशीला लक्ष्य केले आहे. शिल्पाने तिच्या रिलेशनशिपबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस ११’ची विजेती असलेल्या शिल्पाने ‘लॉक अप’ या शोमध्ये तिचा दबदबा निर्माण केला आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झालेली शिल्पा ही पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. अनेक स्पर्धकांबरोबर तिचा वाद झाला असून, आता शिल्पाचे शिवांगी जोशीबरोबर भांडण झाले आहे. शिल्पाने कंट्रोलर म्हणून शिवांगीला हर्षद चोप्राशी कमी बोलण्याचा आदेश दिला होता आणि त्यामुळे वाद आणखी वाढला. त्यानंतर श्रेया कालराशी बोलताना शिल्पाने शिवांगीच्या रिलेशनशिपबाबत वादग्रस्त विधान केले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी यावरून राग व्यक्त केला आहे.

अशा लोकांना समोर उभंही राहू देणार नाही – शिल्पा

शिल्पा शिंदे म्हणाली, “माझ्यामध्ये आणि शिवांगीमध्ये आता वाद होत आहेत. ती फक्त तोंडावर कौतुक करीत असते; पण तिच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तिला मी अजिबात आवडत नाही.” त्यावर श्रेयाने उत्तर दिले, “ती तुझ्यासारख्या लोकांशी मैत्री करीत नाही.” त्यावर शिल्पा म्हणाली, “हो, आम्हीच खूप वाईट आहोत आणि ती तर खूप चांगली आहे. अशा लोकांना मी माझ्यासमोर उभंही राहू देणार नाही. मी तिला योग्य उत्तर देईन. शोमधून जाण्यापूर्वी तिला तिची जागा दाखवूनच जाईन.”

शिल्पा शिंदेचे वादग्रस्त वक्तव्य

शिल्पा शिंदेने शिवांगीच्या रिलेशनशिपबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले, त्यात ती म्हणाली, “हिनं जे काही शो केले आहेत, त्या प्रत्येक शोमध्ये जाऊन तिनं मुलांबरोबर अफेअरच केलं आहे. कुशाल टंडन तर तिच्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा आहे. तरीही त्यांच्याबरोबर हिचं अफेअर होतं आणि त्यानंतरसुद्धा ती अशा प्रकारची अॅक्टिंग करतीये, जसं काहीच माहीत नाही.”

सोशल मीडियावर शिल्पा शिंदेंची व्हिडीओ तुफान व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी तिच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी शिल्पाचे हे वक्तव्य चुकीचे आणि वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “शिल्पाचं हे बोलणं किती वाईट आहे, एखाद्या मुलीबाबत ती असं कसं म्हणू शकते.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “शिल्पा तू आधी तुझं बघून घे.” तर आणखी एका नेटकऱ्याने फराह खानला टॅग करीत “यावर काहीतरी बोला आणि कारवाई करा”, अशी मागणी केली आहे.