Shruti Marathe shares photo with Arshad Warsi: ओटीटीवर सध्या अनेक नवनवीन वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नुकतीच प्रितम अँड पेद्रो ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कॉमेडी थ्रिलर असणारी ही वेब सीरिज सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अविनाश अरुण यांनी वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे, तर राजकुमार हिरानी यांनी लिखाण व निर्मिती केली आहे. या वेब सीरिजमधून त्यांनी ओटीटी पदार्पण केले आहे.
प्रितम व पेद्रो या वेब सीरिजमध्ये अर्शद वारसी, विक्रांत मेस्सी, वीर हिरानी, मोना सिंग, श्रुती मराठे, भारत गणेशपुरे, बोमन ईरानी, सत्यदीप मिश्रा, गौरव मोरे हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत.
अर्शद वारसी हा पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. त्याने पेद्रो ही भूमिका साकारली आहे, तर वीर हिरानीने प्रितम ऊर्फ कबीर सहानी ही भूमिका साकारली आहे. विक्रांत मेस्सी मार्टिन या भूमिकेत आहे. प्रितम व मार्टिन दोघेही सायबर एक्स्पर्ट आहेत, तर मोना सिंग अर्शद वारसीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. सत्यदीप मिश्रा क्रीडामंत्री डी. एन. सरदेसाईच्या भूमिकेत आहे, तर श्रुती डी. एन. सरदेसाईची पत्नी श्रद्धा सरदेसाई या भूमिकेत आहे.
काय आहे प्रितम अँड पेद्रोची गोष्ट?
एक एटीएम चोरीला जाते, त्याचा तपास सुरू असतो. त्याचदरम्यान प्रितम त्याच्या आजोबांचे टेपरेकॉर्डर हरवले आहे अशी तक्रार द्यायला येतो. एटीम व त्यातील पैसे चोरीला गेल्याने पोलिस त्यामध्ये व्यग्र असतात, पण प्रितम त्याची तक्रार लिहून घ्या यासाठी त्यांच्या मागे लागतो. शेवटी तो म्हणतो, पंधरा मिनिटात मी एटीएम मशीन कुठे आहे हे सांगू शकतो. त्यानंतर तो कॉम्प्युटरवर काहीतरी तपासतो आणि एका ठिकाणाचे नाव सांगतो की एटीम मशीन कुठे असेल. पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसत नाही. पण, तरीही ते तिथे जाऊन बघतात आणि त्यांना चोर सापडतात. दरम्यानच्या काळात क्रीडामंत्र्यांच्या पत्नीचा फोन हरवतो आणि इन्स्पेक्टर पेद्रो यांना तो शोधण्यासाठी बोलावले जाते.
पेद्रो बघता क्षणीच सांगतात की फोन मुलाकडे आहे. पण, त्याच्या खोलीत तपास करण्यासाठी नकार दिला जातो. मग पेद्रो मोबाईलच्या दुकानात जातात, नवीन फोन विकत घेतात. एटीएम मशीन चोरी प्रकरणात पकडलेल्या चोराला तो क्रीडामंत्र्याच्या पत्नीचा फोन चोरल्याचा गुन्हा स्वत:वर घ्यायला सांगतात आणि क्रीडा मंत्र्याच्या घरी जातात. मात्र, श्रद्धाचा फोन आधीच सापडलेला असतो. खोटा बनाव केल्यामुळे शिक्षा म्हणून पेद्रोची बदली सायबर युनिटमध्ये होते. त्यानंतर केस सोडवताना पेद्रो प्रितमची मदत घेतो. पुढे असे काही घडते की क्रीडा मंत्र्याच्या घरी तपास करताना श्रद्धाच्या अलेक्साचा पासवर्ड काय असेल, असा विचार करत असताना पेद्रो म्हणतो की १२३४५ असू शकतो आणि विशेष म्हणजे त्याचा अंदाज बरोबर असतो. पुढे जेव्हा श्रद्धाच्या मुलाच्या लॅपटॉपचा पासवर्ड काय असेल असा विचार करत असताना श्रद्धाला विचारले जाते की तिला याबद्दल काही अंदाज आहे का? त्यावर ती १२३४५ असेल, असे म्हणतो. त्यावेळी प्रितम पेद्रोला म्हणतो, तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनले आहात.
श्रुती मराठेने शेअर केला अर्शद वारसीबरोबर फोटो
आता श्रुतीने अर्शद वारसीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, “आमच्या दोघांचा पासवर्ड १२३४५”, पुढे तिने असेही लिहिले आहे की, आम्ही दोघेही खूप हुशार आहोत. शेवटी तिने अर्शद सर असे लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे.
श्रुतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर काहींनी वेब सीरिजमधील मजेशीर डायलॉगही लिहिले आहेत.
आता पहिल्या सीझनला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्यानंतर या वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
