Siddharth Bodke First Look Of Scam 2010 : मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी गेल्या काही दिवसांत हिंदी कलासृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, महेश मांजरेकर असे अनेक नामवंत कलाकार गेली काही वर्षे सातत्याने हिंदीतल्या विविध प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत. यात आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’, ‘दृश्यम’, ‘देवमाणूस’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके आता हिंदी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या सीरिजचा फर्स्ट लूक आणि पोस्टर नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ बोडके हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम २०१०’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना ‘सोनी लिव्ह’वर पाहता येणार आहे. ‘सहारा इंडिया परिवार’चे संस्थापक सुब्रत रॉय यांची गोष्ट या सीरिजद्वारे प्रेक्षकांना पाहता येईल. तमाल बंद्योपाध्याय यांच्या ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकावर आधारित ही सीरिज असेल.
२००० दशकाच्या सुरुवातीला सुब्रत रॉय यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे अनेक आरोप झाले होते, ज्यामुळे २०१४ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. २०२३ मध्ये त्यांचं निधन झालं. मे २०२५ मध्ये या सीरिजची घोषणा केल्यावर ‘सहारा इंडिया परिवार’ने याविरुद्ध कायदेशीर आव्हान दिलं होतं. हा वाद मिटला आहे का, असं ‘व्हरायटी’ने (Variety) सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव बॅनर्जींना विचारलं असता ते म्हणाले, “I believe so.”
‘स्कॅम २०१०’ ही भारतीय आर्थिक घोटाळ्यांवर आधारित फ्रँचायझीमधील तिसरी सीरिज आहे. यापूर्वी ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ आणि ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.
सिद्धार्थ बोडकेवर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्याची पत्नी तितीक्षा तावडेने नवऱ्याच्या सीरिजचं पोस्टर पाहून यावर “My Man” अशी दोन शब्दांची स्पेशल कमेंट केली आहे. यासह प्रथमेश परब, सखी गोखले, सुयश टिळक, पृथ्वीक प्रताप, अमित रेखी, ऐश्वर्या नारकर, गौरी इंगवले या सगळ्या कलाकारांनी सिद्धार्थला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
