Alliance Show Sohel Khan Seema Sajdeh : ‘अलायन्स’ या कुणाल खेमू सूत्रसंलाचन करत असलेल्या रिॲलिटी शोची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत असलेल्या या शोमध्ये अभिनेता सोहेल खान सहभागी झाला. ”वाईल्डकार्ड’ स्पर्धक म्हणून सोहेलची एन्ट्री झाल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र, आता यामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. सोहेलची एक्स पत्नी आणि उद्योजिका सीमा सजदेह हीदेखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. घटस्फोटानंतर प्रथमच हे दोघे एका रिॲलिटी शोमध्ये एकत्र दिसणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोहेल खान हा ‘अलायन्स’मध्ये सहभागी झाल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याच्या गेमकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, आता गेममध्ये आणखी एक ट्विस्ट येणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सोहेलची आधीची पत्नी सीमा सजदेह शोमध्ये सहभागी होणार आहे. याबाबत सीमाने सूचक संकेत दिले असून ती ‘अलायन्स’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. सीमा म्हणाली, “जेव्हा तुम्ही ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर येता तेव्हाच फक्त तुम्हाला सर्वात चांगले अनुभव मिळतात आणि ‘अलायन्स’चा अनुभव अगदी तसाच असणार आहे. हा केवळ टास्क पूर्ण करण्याचा किंवा टिकून राहण्याचा खेळ नाही; तर हा माणसांचा, त्यांची विचारशक्ती, भावना आणि नातेसंबंधांचा खेळ आहे, त्यामुळेच हा शो खूप रोमांचक वाटतोय.”
कठीण निर्णय अन् कसोटीचे क्षण येतील पण…
सीमा पुढे म्हणाली, “मला नेहमीच नवी आव्हानं स्वीकारायला आवडतात, त्यामुळे हा शो माझ्यासाठी स्वतःलाच नव्याने ओळखण्याची एक उत्तम संधी असणार आहे. हेडक्वार्टरमध्ये जाण्यासाठी आणि विविध स्वभावाच्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी मैत्री आणि अलायन्स करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. हा रिॲलिटी शो मला कुठे घेऊन जातो हे मला पाहायचे आहे. या प्रवासात अनेक अनपेक्षित वळणं, कठीण निर्णय आणि कसोटीचे क्षण येतील हे मला माहीत आहे. पण प्रत्येक आव्हानाचा आनंद घेत, स्वतःवर विश्वास ठेवून माझ्या पद्धतीने हा गेम खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.”
सीमा सजदेह व सोहेल खान हे २०२२ मध्ये विभक्त झाले
सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. सोहेलचा पहिला चित्रपट ‘प्यार किया तो डरना क्या’ प्रदर्शित झाला, त्याच दिवशी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केल्याची चर्चा सिनेविश्वामध्ये रंगली होती. सीमा व सोहेल यांना दोन मुलं असून निर्वाण व योहान अशी त्यांची नावं आहेत. मात्र, तब्बल दोन दशकं संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सीमा व सोहेल यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. वैवाहिक नातं संपलं असलं तरी मुलांसाठी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत.
