Sohail Khan Seema Sajdeh : चित्रपट निर्माता व अभिनेता सोहेल खान हा सध्या ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. सोहेलसह त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह हीदेखील सहभागी झाल्याने शोमध्ये रंगत वाढली आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सोहेल व सीमा एकत्र आल्याने त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सीमा ‘वाईल्डकार्ड’ स्पर्धक म्हणून शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सोहेलने आनंद व्यक्त केला होता. यानंतर अनेकदा त्यांच्यामध्ये चर्चा होताना दिसून येते. यानंतर आता गेल्या अनेक वर्षांनंतर त्यांना असा निवांतपणा मिळाला असून सीमाबरोबर त्याला अजून वेळ घालवायचा असल्याचे सोहेलने सांगितले आहे.

सोहेल खानने शोमध्ये झैद दरबारशी बोलताना सीमा सजदेहबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोहेल म्हणाला, “खरं सांगायचं तर या घरात आल्यानंतर मी जितका सीमाच्या जवळ आलो आहे, तितका गेल्या अनेक वर्षांत कधीच आलो नव्हतो. या शोमुळे आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलू लागलो आहोत. घराबाहेर आमच्या दोघांचं वेगळं आयुष्य सुरू होतं. मुलं माझ्याबरोबर राहतात आणि ती सीमालाही भेटायला जातात. येथे येण्यापूर्वी आमच्यामध्ये कोणतंही बोलणं होतं नव्हतं, पण या घरात आल्यानंतर आमच्यात पुन्हा एकदा संवाद सुरू झाला. आम्हाला एकमेकांबद्दल पुन्हा काळजी वाटू लागलीये आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.”

मला तिच्याबरोबर आणखी वेळ घालवायचा – सोहेल

पुढे सोहेल म्हणाला, “असा अनुभव पुन्हा कधी मिळेल हे माहीत नाही, म्हणून या शोचे मी मनापासून आभार मानतो. ती या शोमध्ये येणार आहे हे मला असं आधीच सांगितलं असतं तर येण्याबाबत मी साशंक झालो असतो. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते की, शोमध्ये कोणी सीमाबद्दल वाईट किंवा चुकीचं बोलू नये. मला तिच्याबरोबर आणखी वेळ घालवायचा आहे.”

दिल्लीतील एका लग्नात त्याची व सीमाची भेट झाल्याची आठवण सोहेलने सांगितली. तो म्हणाला, “लग्नामध्ये आमची भेट झाली होती, पण सीमाच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्यामुळे दोघांचं बोलणं बंद झालं होतं. तिचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर साखरपुडा झाला होता. पण, त्या नात्यामध्ये खूप गुदमरल्यासारखं वाटत असल्याचं सीमानं सोहेलला सांगितलं. त्यावेळी सोहेलने तिच्या घरच्यांची भेट घेतली. सीमाच्या वडिलांनी त्याला हिंदू पद्धतीने लग्न करण्याची तयारी आहे का असा प्रश्न विचारला. याबाबत सोहेलने त्याच्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांची भेट झाली आणि अवघ्या आठवडाभरात दोघांचं लग्न पार पडलं.”

सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. सीमा व सोहेल यांना दोन मुलं असून निर्वाण व योहान अशी त्यांची नावं आहेत. मात्र, तब्बल दोन दशकं संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सीमा व सोहेल यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. वैवाहिक नातं संपलं असलं तरी मुलांसाठी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत. आता ते पुन्हा एकदा शोमध्ये एकत्र आले आहेत.