दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या विजय सेतुपतीची सध्या चांगलीच चर्चा आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत विजय सेतुपतीला खूप जास्त मान आहे. आता विजय लवकरच हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे. विजयच्या दर्जेदार अभिनयाचे सगळेच चाहते आहेत पण त्याचा स्वॅग आणि त्याची देहबोली लोकांना प्रचंड आवडते. आता आगामी ‘फर्जी’ या वेबसीरिजमध्येसुद्धा विजय सेतुपती पुन्हा अशाच एका डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे.
विजय सेतुपतीला सध्या ‘पॅन इंडिया स्टार’ म्हणून बऱ्याचदा संबोधलं जातं. याबद्दल नुकतंच त्याने ‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. विजयला सतत ‘पॅन इंडिया स्टार’ असं संबोधणं आवडत नसल्याचा त्याने खुलासा केला आहे.
आणखी वाचा : सिद्धार्थ – कियाराच्या लग्नात काढता येणार नाहीत फोटो; पाहुण्यांच्या मोबाईलसाठी बनवण्यात आलं खास कव्हर
याविषयी बोलताना विजय सेतुपती म्हणाला, “नाही सर, मी एक अभिनेता आहे. मला हे दिलेलं ‘पॅन इंडिया’ बिरुद अजिबात आवडत नाही. कधीकधी मला त्याचं दडपण येतं. मी एक अभिनेता आहे मला कोणतंही लेबल लावायची गरज नाही.” इतकंच नाही तर त्याने इतरही भाषांमध्ये चित्रपट करायची इच्छासुद्धा व्यक्त केली आहे.
विजय सेतुपतीच्या या वक्तव्याला अभिनेत्री राशी खन्नानेसुद्धा दुजोरा दिला. ती म्हणाली, “अशी बिरुद लावून तुम्ही आमच्यात दरी का निर्माण करत आहात? आपण आधीच बॉलिवूड, टॉलीवूड, कॉलीवूडमध्ये विभागले गेलो आहोत. प्रत्येकाला एखाद्या साच्यात बसवायची काहीच गरज नाही.” विजय सेतुपती आणि राशी खन्ना हे दोघेही ‘फर्जी’ या आगामी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. शाहिद कपूर या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज १० फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.