या आठवड्यात ओटीटीवर दाक्षिणात्य भाषांमधील अनेक नवीन चित्रपट रिलीज होणार आहेत. यामध्ये अॅक्शन, थ्रिलरपासून रोमँटिक आणि कॉमेडी-ड्रामापर्यंत विविध प्रकारच्या कलाकृतींचा समावेश आहे. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांची नेहमीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असते. ओटीटीवरही या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच आता ओटीटीवरही या आठवड्यात वेगळे कथानक असलेले चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या आठवड्यात ओटीटीवर कोणते दाक्षिणात्य चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊया.

या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार हे दाक्षिणात्य चित्रपट

‘कट्टालन’ – ‘कट्टालन’ हा मल्याळम भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, पॉल जॉर्ज यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अँटोनी वर्गीस पेपे, सुनील, कबीर दुहान सिंह, जगदीश, दुशारा विजयन, हिप्स्टर आणि हनान शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय लोकप्रिय दिग्दर्शक लोकेश कनगराजही पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट १३ ऑगस्टपासून मनोरमा मॅक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

‘मिस्टर वर्क फ्रॉम होम’ – ‘मिस्टर वर्क फ्रॉम होम’ ही अरविंद नावाच्या एका तरुणची गोष्ट आहे. घरून काम करणं हेच यशाचं गमक आहे, असा त्याचा ठाम विश्वास असतो. मात्र, जेव्हा तो आपल्या गावापासून दूर राहून काम करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याच्या आरामदायी आणि तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीचा सामना गावातील पारंपरिक मूल्यांशी होतो. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये त्रिगुण, पायल राधाकृष्ण, अनीश कुरुविला, शिवाजी राजा, हर्षवर्धन, सत्य कृष्णन आणि हर्ष चेमुडू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मधुदीप चेलिकानी दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ पासून Sun NXT वर पाहता येणार आहे.

‘आरूपी’ – ‘आरूपी’ ही एका बदला घेणाऱ्या महिलेची गोष्ट आहे. आर्यनट्टू इस्टेटमध्ये एका बाहुलीच्या आत तिला कैद करण्यात आलं होतं. मात्र, दोन चोरांच्या चुकीमुळे तिची सुटका होते आणि त्यानंतर भयंकर घटनांना सुरुवात होते. अभिलाष वारियर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सुपरनॅचरल हॉरर थ्रिलरमध्ये वैशाख रवी, नेहा चावला, जॉय मॅथ्यू, सिंधू वर्मा, साक्षी बडाला, कन्नन सागर आणि नेबू अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा मल्याळम चित्रपट १४ ऑगस्टपासून प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे.