South Suspense Thriller Movie On OTT : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे अनेक नवीन पर्याय खुले झाले आहेत. ओटीटीमुळे ओटीटी प्रेमींना जगभरातील विविध प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार कलाकृती पाहायला मिळत आहेत. मग ती एखादी वेबसीरिज असो किंवा चित्रपट. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांनी तर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. असाच एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट सध्या ओटीटीवर चर्चेत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत ॲक्शनबरोबरच सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांची पर्वणीही प्रेक्षकांना दिली आहे. जर तुम्हाला दाक्षिणात्य सिनेमे आणि सस्पेंस-थ्रिलर कथा आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘सेकंड केस ऑफ सीताराम’ (Second Case of Sitaram) असे आहे. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १७ एप्रिल २०२६ पासून हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाचे दिग्दर्शन देवी प्रसाद रेड्डी यांनी केले असून विजय राघवेंद्र आणि गोपालकृष्ण देशपांडे यांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

‘सेकंड केस ऑफ सीताराम’ची कथा काय आहे?

या चित्रपटाची कथा उडपीमध्ये तैनात असलेल्या एका पोलीस ऑफिसरभोवती फिरते, जो एकामागून एक होणाऱ्या खुनांचे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, प्रत्येक खून एकाच पद्धतीने केला जातो आणि खुनी प्रत्येकवेळी एक पुरावा मागे सोडतो. चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये तुम्हाला सस्पेन्स उलगडल्यासारखे वाटेल, पण कथेतील अनपेक्षित वळण प्रेक्षकांना शेवटपर्यंत गोंधळात टाकतात. चित्रपटात क्षणोक्षणी नवनवीन ट्विस्ट पहायला मिळतात.

‘सेकंड केस ऑफ सीताराम’ हा चित्रपट ‘सीताराम बिनॉय केस नंबर १८’ चा सीक्वेल आहे. पहिल्या भागात एका प्रामाणिक पोलीस ऑफिसरची कथा दाखवण्यात आली होती आणि आता हीच कथा पुढे नेण्यात आली आहे. आयएमडीबी (IMDb) वर चित्रपटाला ६.७ रेटिंग मिळाले आहे.

‘सेकंड केस ऑफ सीताराम’ ओटीटीवर ट्रेंडिंग

‘सेकंड केस ऑफ सीताराम’ हा चित्रपट केवळ कन्नडमध्येच नाही, तर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही पाहता येईल. हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. जर तुम्हाला क्राईम, मिस्ट्री आणि पोलीस तपासावर आधारित चित्रपट पाहायला आवडत असतील, तर ‘सेकंड केस ऑफ सीताराम’ हा चित्रपट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.