‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा टॉम हॉलंड अभिनीत चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळानंतर, ६ ऑक्टोबरपासून हा चित्रपट डिजिटल खरेदी आणि रेंटसाठी उपलब्ध झाला आहे.
एबीपीच्या वृत्तानुसार चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबाबत चर्चा आणि तर्कवितर्क सुरू असतानाच सोनी पिक्चर्सने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. हा चित्रपट Apple TV, प्राईम व्हिडीओ, Fandango आणि Sony Pictures Core या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर रेंटसाठी उपलब्ध होईल.
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ OTT रिलीज
‘स्पायडर-मॅन’ फ्रँचायझीतील हा नवीन चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी ET वर प्रीमियम व्हिडिओ ऑन डिमांड(PVOD) म्हणून रिलीज होणार आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांना हा चित्रपट प्राईम व्हिडीओ आणि Apple TV वर २९.९९ डॉलरला खरेदी, तर २४.९९ डॉलरला रेंट करता येईल. प्राईम व्हिडीओवर चित्रपट रेंट किंवा खरेदी करण्यासाठी मेंबरशीपची आवश्यकता नाही.
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार?
सध्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या नेटफ्लिक्सवरील रिलीजची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सोनी पिक्चर्स आणि नेटफ्लिक्स यांच्यातील करारानुसार हा चित्रपट भविष्यात अमेरिकेत नेटफ्लिक्सवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या करारामध्ये सोनी पिक्चर्सचे थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट तसेच मार्वलच्या पात्रांवर आधारित चित्रपट, ज्यात ‘स्पायडर मॅन’ फ्रँचायझीचाही समावेश आहे, अशा चित्रपटांचासमावेश आहे.
याशिवाय सोनी पिक्चर्स आणि नेटफ्लिक्स यांच्यात व्यापक जागतिक करारही आहे. संबंधित हक्क उपलब्ध झाल्यानंतर विविध देशांमध्ये सोनी पिक्चर्सच्या चित्रपटांसाठी नेटफ्लिक्स हे पहिले सबस्क्रिप्शन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असेल.
दरम्यान, हॉलीवूड अभिनेता टॉम हॉलंड आणि अभिनेत्री झेंडया यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने सॅक्निल्कच्या वृत्तानुसार एकूण २३,४८०.६० कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं, तर भारतात या चित्रपटाने ५००.५८ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. या चित्रपटाचं बजेट २,३०० कोटी रुपये इतकं होतं.
