सध्या कोरियन ड्रामा आणि सीरिजचा मोठा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक जण कोरियन ड्रामा, चित्रपटांचे चाहते आहेत. अशातच नेटफ्लिक्सवर जवळपास तीन आठवड्यांपूर्वी रिलीज झालेली एक सीरिज सध्या टॉप १० मध्ये आपलं स्थान कायम ठेवून आहे.

या हॉरर, रोमँटिक आणि कॉमेडी सीरिजला IMDb वर ७.८ रेटिंग मिळालं आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीचे ६ एपिसोड रिलीज झाल्यानंतर आता या सीरिजचे पुढील एपिसोड एक-एक करून प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय घडणार, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

भीतीदायक आणि रंजक आहे कथा

१८ जुलै २०२६ रोजी tvN आणि नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ही सीरिज २०११ मध्ये आलेल्या ‘स्पेलबाउंड’ या चित्रपटावर आधारित आहे. यात पार्क युन-बिनने अशा हॉटेलच्या CEOची भूमिका साकारली आहे, जिला भूत दिसू शकतात. तर यांग से-जोंगने एका अशा सरकारी वकिलाची भूमिका साकारली आहे, ज्याला भुतांची प्रचंड भीती वाटते. हे दोघे मिळून अनेक वर्षांपासून न सुटलेली प्रकरणं म्हणजेच कोल्ड केसेस सोडवण्याचा प्रयत्न करतात.

काय आहे सीरिजचं नाव

या सीरिजचं नाव ‘स्पूकी इन लव्ह’ (Spooky in Love) आहे. या सीरिजची कथा चेओन येओ-री-की नावाच्या एका श्रीमंत घराण्याची वारस आणि हॉटेल CEOभोवती फिरते. तिला भुतं दिसतात आणि त्यामुळे दररोज तिला मृत व्यक्तींच्या आत्म्यांचा त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे मा कांग-चू हा एक सरकारी वकील असून तो न सुटलेल्या हत्येच्या प्रकरणांचा तपास करत असतो. या दोघांची भेट होते आणि विचित्र प्रकरणं सोडवताना त्यांच्यात प्रेम फुलतं.

‘स्पूकी इन लव्ह’ ही कोरियन हॉरर-रोमँटिक-कॉमेडी टीव्ही सीरिज आहे. या सीरिजचं लेखन चोई जंग-मी यांनी केलं असून ली मिन-सू यांनी दिग्दर्शन केलं आहे. यात पार्क युन-बिन, यांग से-जोंग आणि ऑग सोंग-वू प्रमुख भूमिकेत आहेत.

सीरिजच्या रिलीजबद्दल

ही सीरिज २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्पेलबाउंड’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘स्पूकी इन लव्ह’चा प्रीमियर १८ जुलै २०२६ रोजी tvNवर झाला असून, ही सीरिज दर शनिवार आणि रविवारी रात्री ९:१० वाजता प्रसारित होते. ही सीरिज नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे. आतापर्यंत सीरिजचे ६ एपिसोड रिलीज झाले असून, ७वा एपिसोड ८ ऑगस्टला स्ट्रीम होणार होता. तर २३ ऑगस्टला सीरिजचा शेवटचा एपिसोड स्ट्रीम होईल. एकूण १२ एपिसोड असलेल्या या सीरिजचे उर्वरित एपिसोड पुढीलप्रमाणे रिलीज होतील

८वा एपिसोड: ९ ऑगस्ट
९वा एपिसोड: १५ ऑगस्ट
१०वा एपिसोड: १६ ऑगस्ट
११वा एपिसोड: २२ ऑगस्ट
१२वा एपिसोड: २३ ऑगस्ट