Watch These Marathi Movies On Ott : मराठीमध्ये कथानकच हिरो असते असं आपण अनेकदा एकतो. मराठी प्रेक्षक पडद्यावर दिसणारा कलाकार कसा दिसतो यापेक्षा तो कसं काम करतो याला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे आजवर मराठीमध्ये विविध आशय आणि विषय असलेले चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि त्यामधून विविध कलाकारांनी चोख काम केलं आहे. पण, अनेकदा मोठं बजेट असलेल्या चित्रपटांच्या लाटेत हे चित्रपट मागे राहतात आणि प्रेक्षकांपर्यंत तितके पोहोचत नाहीत.
सध्या ओटीटीवरही विविध मराठी चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला मिळत आहेत, त्यामुळे या आठवड्यात घरबसल्या उत्कृष्ट कथानक असलेल्या कलाकृती पाहायच्या असतील तर आम्ही तुम्हाला काही विविध कथानक असलेल्या मराठी चित्रपटांची नावं सांगणार आहोत. या यादीत कोणत्या चित्रपटाचं नाव आहे जाणून घेऊयात…
ओटीटीवर पाहा ‘हे’ मराठी चित्रपट
स्थळ – २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कथेने अनेकांची पसंती मिळवली. यामध्ये अरेंज मॅरेज आणि ग्रामीण भागात असलेल्या पुरुष प्रधान समाजाची वस्तुस्थिती दाखवली आहे. यामध्ये नंदिनी चौधरी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
दशावतार – जर तुम्हाला मातीशी जोडलेले आणि त्याला सस्पेन्स व थ्रिलरची जोड असलेले चित्रपट पाहायचे असतील तर दशावतार हा उत्तम पर्याय आहे. सुबोध करने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
सैराट – नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये समाजात असलेल्या जाती व्यवस्था आणि प्रेम विवाह यावर भाष्य करण्यात आलं आहे. रिंकू राजगुरू व आकाश ठोसरचा हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
कोर्ट – जैतन्य ताम्हणे दिग्दर्शित हा चित्रपट भारतातील न्यायव्यवस्थेवर बनला असून हा एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा आहे. एका ज्येष्ठ गायकाची ही कथा आहे, ज्यांच्यावर एका कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी भडकवण्याचा आरोप आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
हरिश्चंद्राची फॅक्ट्री – हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित आहे. यामध्ये त्यांचा संघर्षकाळ पाहायला मिळतो. हा चित्रपटसुद्धा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
नटसम्राट – निवृत्त झालेल्या रंगमंचावरील कलाकाराची ही गोष्ट आहे. चित्रपटातील नाना पाटेकर यांचे संवाद आणि त्यांचा अभिनय भावनिक ठरतो. हा चित्रपट एक मास्टरपिस आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

