Chetak Screen Awards 2026: आता सिनेमा म्हणजे फक्त मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी उरलेल्या नाहीत. खरं तर, थिएटरप्रमाणेच आता ओटीटीवरही चित्रपट प्रदर्शित केले जातात. यामुळे नवीन कलाकारांसाठी संधी वाढल्या आहेत. म्हणूनच, ओटीटी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची स्वतंत्रपणे दखल घेणं आता आवश्यक झालं आहे. यंदाचा ‘ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट’ कोणता ठरणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होता. तर चेतक स्क्रीन अवॉर्डमध्ये अभिषेक बॅनर्जीच्या ‘स्टोलन’ (Stolen) हा पुरस्कार मिळाला आहे.
या शर्यतीत आरती कडव यांचा ‘मिसेस’, हनी त्रेहन यांचा ‘रात अकेली है – द बन्सल मर्डर्स’, अनुषा रिझवी यांचा ‘द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली’ आणि बोमन इराणी यांचा ‘द मेहता बॉईज’ यांसारखे चित्रपट होते. या सर्वांना मागे टाकत ‘स्टोलन’ने बाजी मारली.
रविवार, ५ एप्रिल रोजी मुंबईत पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात सौरभ शुक्ला आणि गुनीत मोंगा यांच्या हस्ते ‘स्टोलन’च्या टीमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, कॉमेडियन झाकीर खान आणि सुनील ग्रोवर, तसेच ज्येष्ठ पत्रकार सौरभ द्विवेदी (संपादक – हिंदी, द इंडियन एक्सप्रेस) यांनी केले.
‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’द्वारे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वसनीय चित्रपट पुरस्कार मानले जातात. कलेचा गौरव हा केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि आदर यावरच आधारित असावा, या विश्वासातून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ चे नामांकन आणि विजेते यांची निवड ‘स्क्रीन अकादमी’ (SCREEN Academy) या स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने केली आहे. या अकादमीमध्ये ५३ नामवंत चित्रपट निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.
विजेते निवडण्याची पद्धत
शॉर्टलिस्टिंगनंतर स्क्रीन अकादमीने एका शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेद्वारे चित्रपटांचे मूल्यमापन केले. लॉस एंजेलिसमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ येथील सिनेमा आणि मीडिया स्टडीजच्या प्रमुख आणि स्क्रीन अकादमीच्या स्कॉलर-इन-रेसिडेंस डॉ. प्रिया जयकुमार यांनी यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती.
या अकादमीमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सामील आहेत, ज्यात सुजित सरकार, दीपा मेहता, श्रीराम राघवन, राम माधवानी, कबीर खान, करण जोहर, राजकुमार हिराणी, आर. एस. प्रसन्ना आणि राजीव मेनन या दिग्दर्शकांचा समावेश आहे. तसेच कलाकार आणि इतर तज्ज्ञांमध्ये विद्या बालन, जॉन अब्राहम, प्रसेनजित चॅटर्जी, गुनीत मोंगा कपूर, मुकेश छाब्रा, पायल कपाडिया, रसूल पुकुट्टी आणि रिमा दास यांचा समावेश आहे.
