sunil pal and samay raina controversy : कॉमेडियन सुनील पाल हे नुकतेच नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसून आले. २ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या भागामध्ये रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यासह सुनील पाल सहभागी झाले. वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या समय व रणवीर यांच्यावर चित्रित झालेल्या एपिसोडला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
सोशल मीडियावर ‘कपिल शर्मा शो’च्या या एपिसोडची जोरदार चर्चा झाल्याचे दिसून आले. मात्र, टीआरपी वाढवण्यासाठी मला बोलावण्यात आले आणि माझ्यावर सर्वांनी टीका केली, अशी खंत कॉमेडियन सुनील पाल यांनी व्यक्त केली.
सुनील पाल व समय रैना यांच्यामध्ये वादाची ठिणगी
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुरज कुमारने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुनील पाल यांनी कपिल शर्मा शोवर आरोप करीत धक्कादायक खुलासे केले. समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांचा सध्या वाईट काळ सुरू आहे. या दोघांना पुन्हा लाइमलाईटमध्ये आणण्यासाठी नेटफ्लिक्सने त्यांना शोमध्ये बोलावले आणि दोघांना हायलाईट केले आणि टीआरपी वाढवण्यासाठी मला तिथे बोलावण्यात आले, असा आरोप सुनील पाल यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, मी फक्त तिथे येऊन थांबलो होतो. मी कोणतीही कला सादर केली नाही. मला स्टँड-अप कॉमेडी करण्यासाठी वेळ दिला जाणार होता; मात्र तोदेखील त्यांनी दिला नाही, असे विधान कॉमेडियन सुनील पाल यांनी केले. चित्रीकरणाच्या वेळी नवजोत सिंह सिद्धू यांच्याकडूनदेखील भेदभावाची वागणूक मिळाल्याचे कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितले.
माझे विनोद कमी करण्यात आले – सुनील पाल
त्याचबरोबर आपल्याला शोमध्ये रणवीर आणि समय येणार असल्याचे माहीत नसल्याचेदेखील सुनील यांनी सांगितले. ते म्हणाले, “मला अजिबात माहीत नव्हते की, समय रैनादेखील तेथे उपस्थित असणार आहे. शोमध्ये इतर स्टँडअप कॉमेडियन असतील आणि कदाचित समय येईल, असे सांगण्यात आले होते. मला प्रश्नोत्तरांसाठी नाही, तर स्टँड-अप कॉमेडी करण्यासाठी वेळ देण्यात येणार होता. त्यासाठी मी १५ ते २० मिनिटांची स्क्रिप्ट तयार केली होती, ज्यासाठी दिग्दर्शक अनुकूल यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र, नंतर मला कळलं की, ते दोघे आले आहेत आणि मला स्टँड-अप कॉमेडी करण्याची संधी दिली गेली नाही. मी जे काही थोडे-फार विनोद केले होते, तेसुद्धा कमी करण्यात आले,” अशी नाराजी कॉमेडियन सुनील पाल यांनी व्यक्त केली.
हे एक षडयंत्र होतं – सुनील पाल
सुनील पाल यांनी सांगितले की, त्या शोमध्ये मला एकटे पाडण्यात आले होते. काही क्षणी मला तर असे वाटले की, मला कोपऱ्यात ढकलून देण्यात आले आणि मला हेतुपुरस्सर लक्ष्य करण्यात आले. प्रेक्षकांना माझ्या विनोदावर हसू नका हेदेखील सांगितले गेले होते आणि दुसऱ्या लोकांच्या छोट्याशा जोक्सवरसुद्धा हास्यकल्लोळ होत होता. अनेकांच्या नजरेत ही गोष्ट आली. हे एक षडयंत्र होतं, असे अनेक घणाघाती आरोप कॉमेडियन सुनील पाल यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’वर केले आहेत.
