Akshaye Khanna & Sunny Deol’s Ikka Ott Release Date : बॉलीवूडमधील दोन दमदार अभिनेते सनी देओल आणि अक्षय खन्ना लवकरच एकत्र झळकणार आहेत. या दोघांच्या आगामी ‘इक्का’ या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. परंतु, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सनी देओल व अक्षय खन्ना यांच्या ‘इक्का’ चित्रपटाची चर्चा सुरू होती. अशातच आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली असून प्रेक्षकांना घरबसल्या हा कोर्टरूम ड्रामा पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘धुरंधुर’नंतर पहिल्यांदाच अक्षय खन्ना एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येसुद्धा याबद्दल उत्सुकता आहे. आता ‘इक्का’ हा चित्रपट कधी आणि कुठे रिलीज होणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
कधी रिलीज होणार सनी देओल-अक्षय खन्नाचा इक्का?
‘इक्का’ हा एक कोर्टरूम ड्रामा असून महत्त्वाचं म्हणजे सनी देओल आणि अक्षय खन्ना यामधून जवळपास ३० वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या दोन दमदार अभिनेत्यांना एकत्र पाहणं रंजक ठरेल. अक्षय आणि सनी देओल यांचा ‘इक्का’ चित्रपट येत्या १० जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सनी देओलसाठी हा चित्रपट अधिक खास आहे कारण या मधून तो ओटीटीवर पदार्पण करत आहे. सनी देवल ‘इक्का’मध्ये वकिलाची भूमिका साकारणार असून तो चित्रपटात अक्षय खन्नाची केस लढताना दिसणार आहे. प्रामाणिक आणि कायम सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या सनी देओलच्या पात्राला काही कारणामुळे खुनाचा आरोपी असलेल्या अक्षय खन्नाची केस लढावी लागतं.
नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट वाईस प्रेसिडेंट मोनिका शेरगिल यांनी ‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना सांगितलं की ‘इक्का’मध्ये कोर्टरूम ड्रामामध्ये असायला हव्या त्या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामधून तब्बल तीस वर्षानंतर सनी देओल वकिलाच्या भूमिकेतून झळकणार आहे. त्यामुळे एकूणच ओटीटीवरील पदार्पण आणि अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा वकिलाची भूमिका यामुळे सनी देओलच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास ठरेल. तर दुसरीकडे ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकल्यानंतर अक्षय खन्नाला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, सनिदेवल व अक्षय खन्ना यांनी १९९७ मध्ये आलेल्या लोकप्रिय ‘बॉर्डर’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता २९ वर्षानंतर हे दोन्ही अभिनेते पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत.
