'तुम्ही देशातील तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात'; सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारले | Supreme Court Slams Ekta Kapoor For Triple X Web Series Says You Are Polluting Minds Of Young Generation nrp 97 | Loksatta

‘तुम्ही देशातील तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात’; सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

“अशा याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करु.”

ekta kapoor

प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि टेलिव्हिजन क्वीन अशी ओळख असलेली एकता कपूरला सर्वोच्च न्यायलयाने फटकारले आहे. ‘ट्रीपल एक्स’ या सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवरुन सर्वोच्च न्यायलयाने खडे बोल सुनावले आहेत. ‘तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात’ अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारले.

अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलेली ‘ट्रीपल एक्स’ ही वेबसीरिज सध्या चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली एकता कपूर विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. या अटक वॉरंटला आव्हान देण्यासाठी एकता कपूरच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायलयाने एकता कपूरला खडे बोल सुनावले.

तुम्ही लोकांना कशाप्रकारचे पर्याय देत आहात?

न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने या सुनावणीदरम्यान म्हटलं की, याबद्दल निश्चितरित्या काही तरी करणे गरजेचे आहे. आपण या देशातील तरुण पिढीची मानसिकता दुषित करत आहात. ही वेबसीरिज सर्वांसाठी उपलब्ध आहे. ओटीटी हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही लोकांना कशाप्रकारचे पर्याय देत आहात? याद्वारे तरुणांची मनं प्रदूषित करत आहात, अशा शब्दात कोर्टाने एकता कपूरला फटकारले.

त्यावर एकता कपूरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, याबद्दल पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण या प्रकरणी तिथे लवकर सुनावणी होईल की नाही याबद्दल शंका आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात एकता कपूर यांना संरक्षण दिले होते. ही वेबसीरिज एका ठराविक विषयावर आधारित आहे आणि या देशात कोणाला काहीही आवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

आम्हाला काहीही कौतुक नाही

यावर कोर्टाने म्हटलं की, तुम्ही लोकांना नेमके कोणत्या प्रकारचे पर्याय देता? तुम्ही प्रत्येक वेळी कोर्टात येता, याचे आम्हाला काहीही कौतुक नाही. या अशा याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करु. कोर्टानं म्हटलं की, रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता. हे न्यायालय प्रभाव असलेल्या लोकांसाठी नाही तर आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असं कोर्टानं म्हटलं.

बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरून एकता कपूरच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. शंभू कुमार यांनी २०२० मध्ये याबद्दल तक्रार दाखल केली होती. ‘थ्री एक्स’ (सीजन-२) मध्ये सैनिकाच्या पत्नीचा संबंध असलेली अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवली होती, असा आरोप त्यांनी केला होता.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2022 at 09:02 IST
Next Story
‘मिर्झापूर ३’ वर बंदी घालण्यास कोर्टाचा नकार; ‘या’ कारणांसाठी दाखल करण्यात आली होती याचिका