Viswanath And Sons Netflix Suriya OTT Release Trending No 1: तमिळ सुपरस्टार सूर्याचा ‘विश्वनाथ अँड सन्स’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होता. त्यानंतर आता महिनाभराने तो ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. ११ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला हा चित्रपट अवघ्या २४ तासांत १ नंबरवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाने अजय देवगणचा ‘धमाल ४’, आर. माधवनचा ‘GND’ आणि तापसी पन्नूचा ‘गांधारी’ या मोठ्या चित्रपटांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
‘विश्वनाथ अँड सन्स’चा ओटीटीवर जलवा
नेटफ्लिक्सवर रिलीज होताच अवघ्या २४ तासांच्या आत या चित्रपटाचा नेटफ्लिक्सवर जलवा पाहायला मिळतोय. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, आता प्रेक्षक घरबसल्या नेटफ्लिक्सवर याचा आनंद घेऊ शकतात. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. वेंकी अट्लुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्याबरोबर ममिता बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत.
‘विश्वनाथ अँड सन्स’ची कथा
या चित्रपटाची कथा संजय विश्वनाथ (सूर्या) याच्याभोवती फिरते. तो ४२ वर्षांचा एक यशस्वी उद्योजक आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज आहे. संजय कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतो, मात्र त्याच्या आईच्या (राधिका सरथकुमार) इच्छेपोटी आणि घराण्याचा वारसा पुढे चालवण्याच्या दबावामुळे, तो सरोगसीद्वारे बाबा होतो. पण त्याचं बाळ आजारी पडतं. त्यानंतर मॅडी (ममिता बैजू) ही सरोगेट मदर संजयच्या आयुष्यात येते. मुलाच्या आजारपणाच्या आणि त्याच्या देखभालीच्या काळात, वयात अंतर असूनही, मॅडी आणि संजय यांच्यात एक नातं तयार होतं. त्यानंतर काय घडतं, यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.
‘विश्वनाथ अँड सन्स’ची कमाई
‘विश्वनाथ अँड सन्स’चे बजेट १२० कोटी रुपये होते. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात एकूण १२१.५० कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला असून, याचे वर्ल्डवाइड कलेक्शन २०५.५५ कोटी रुपये झाले आहे. तसेच जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन २५० कोटी रुपये आहे.
