Prajakta Mali and Ankush Choudhary Web Series: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ही मालिका असो, ‘फुलवंती’, ‘हंपी’ असे विविध सिनेमे असो किंवा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो असो, प्राजक्ता माळी कायमच लक्ष वेधून घेते.
प्राजक्ता माळी ही अभिनय आणि सूत्रसंचालन या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील तिच्या सूत्रसंचालनालादेखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते.
आता प्राजक्ता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीने इन्स्टाग्रामवर एक मोशन पिक्चर शेअर केले आहे. यामध्ये पाण्यात एक प्रतिकृती दिसत आहे, तसेच पाण्यात एक मृतदेह दिसत आहे.
ही पोस्ट शेअर करताना झी मराठी वाहिनीने लिहिले, “पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार”, तसेच पुढे लिहिले आहे की, अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेली मराठी वेब सीरिज ‘देवखेळ’ लवकरच ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे.
प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी एकत्र दिसणार
या वेब सीरिजचे नाव ‘देवखेळ’ असे आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन चंद्रकांत लता गायकवाड यांनी केले आहे. यामध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्यासह सायली देवधर, मंगेश देसाई, वीणा जामकर असे अनेक कलाकार दिसणार आहेत.
झी मराठी वाहिनीने ही पोस्ट शेअर करताना अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांना टॅग केले आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. नेटकरी नेमके काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊ…
नेटकरी काय म्हणाले?
एकाने लिहिले, “अंकुश चौधरीला वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “वाह! ग्रेट”, एकाने लिहिले, “याची खूप उत्सुकतेने वाट पाहात आहे’, आणखी एकाने लिहिले, “कृपया तारीख सांगा”, एकाने लिहिले, “मस्तच”, आणखी एकाने लिहिले, “माझ्या आवडत्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे”, एकाने लिहिले, “वाट पाहत आहे”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी ते या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे सांगितले.


दरम्यान, अंकुश चौधरीने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता तो एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता प्राजक्ता आणि अंकुशची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
