रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ हा ॲक्शन-क्राइम चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या चित्रपटांची आवड असेल आणि तुम्ही घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एखादा चांगला चित्रपट शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला एका खास चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. सध्या नेटफ्लिक्सवर एका हॉलीवूड चित्रपटाची मोठी चर्चा आहे. यामध्ये जबरदस्त सस्पेंस आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. या चित्रपटाचे नाव आणि त्याची कथा काय आहे, ते जाणून घेऊयात.
२०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता हा चित्रपट
या चित्रपटाचे नाव ‘रेप्टाइल’ (Reptile) आहे. तो २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ग्रांट सिंगर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये बेनिसियो डेल टोरो, एलिसिया सिल्वरस्टोन आणि जस्टिन टिम्बरलेक यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता या चित्रपटाची नेमकी कथा काय आहे, ते पाहूयात.
‘रेप्टाइल’ चित्रपटाची कथा
‘रेप्टाइल’ या चित्रपटाची कथा एका अत्यंत गुंतागुंतीच्या खुनाच्या तपासाभोवती फिरते. हा चित्रपट केवळ एक क्राईम थ्रिलर नसून त्यामध्ये मानवी स्वभावाचे विविध पैलू आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतो. एक तरुण रिअल इस्टेट एजंट समर हिची तिच्याच घरात निर्घृण हत्या होते. तिचा मृतदेह तिच्या बॉयफ्रेंडला एका घरात सापडतो. या खुनाचा तपास अनुभवी डिटेक्टिव्ह टॉम निकोल्स (बेनिसियो डेल टोरो) यांच्याकडे सोपवला जातो. सुरुवातीला संशयाची सुई तिचा प्रियकर, तिचा एक्स पती आणि एका शेजाऱ्यावर असते. प्रत्येक संशयिताकडे काहीतरी लपवलेली गुपिते असतात, ज्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होते.
जसा जसा तपास पुढे सरकतो, तसे टॉमला जाणवतं की हा केवळ एक साधा खुनाचा गुन्हा नाही. यामागे त्याच्या स्वतःच्या पोलीस विभागातील आणि ओळखीच्या लोकांचा मोठा हात असू शकतो. चित्रपट जसा शेवटच्या टप्प्याकडे जातो, तसे अनेक धक्कादायक खुलासे होतात. टॉमला आपले कर्तव्य आणि आपली जवळची माणसं यांपैकी एकाची निवड करावी लागते. शेवटची तो कोणाला निवडतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘रेप्टाइल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहावा लागेल.
२ तास १६ मिनिटांचा आहे चित्रपट
‘रेप्टाइल’ चित्रपटाला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाचा सस्पेन्स व ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. २ तास १६ मिनिटांचा हा चित्रपट पाहताना तुमची नजर स्क्रीनवरून हटणार नाही.
