Taapsee Pannu Gandhari Netflix Record: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा बहुचर्चित ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘गांधारी’ (Gandhari) सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. मुलीच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या एका आईची थरारक कथा मांडणाऱ्या या चित्रपटाने भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. ३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारतासह तब्बल ८ देशांमध्ये थेट नंबर १ वर ट्रेंड करत आहे. याशिवाय इतर ४९ देशांमध्येही नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ सिनेमांच्या यादीत स्थान मिळवून चित्रपटाने जागतिक स्तरावर यश मिळवले आहे.
गांधारी ८ देशांमध्ये नंबर १ वर ट्रेंडिंग
कनिका ढिल्लों लिखित व निर्मित आणि देवाशिष मखिजा दिग्दर्शित ‘गांधारी’ या चित्रपटाने फक्त भारतीय प्रेक्षकांचं नव्हे तर जगभरातील विविध देशांतील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. हा चित्रपट भारत, बांगलादेश, पाकिस्तान, युएई, बहरीन, ओमान, श्रीलंका आणि मॉरिशस या ८ देशांमध्ये नंबर १ वर ट्रेंड करत आहे. याशिवाय इतर ४९ देशांमध्येही तो नेटफ्लिक्सवर टॉप १० च्या यादीत आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या या उदंड प्रतिसादावर तापसी पन्नूने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
तापसी पन्नू म्हणाली, “आमचा चित्रपट एकाच वेळी इतक्या देशांतील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होतोय, हा विचार करून मला रात्री झोप येत नव्हती. पण आम्ही ८ देशांत नंबर १ वर आणि ४९ देशांत टॉप १० मध्ये आहोत हे सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे. आम्ही हा चित्रपट बनवला, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की ही अत्यंत स्थानिक पार्श्वभूमी असलेली कथा आहे आणि फक्त भारतीय प्रेक्षकच ‘बनी’च्या विश्वाशी कनेक्ट करतील, पण या सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.”
‘गांधारी’ला जगभरात मिळणारा प्रतिसाद खास आहे, कारण याची कथा भारतीय भावना आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेली आहे. महाभारतातील गांधारीच्या मूळ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन कनिका ढिल्लों यांनी एका आईचे प्रेम, संघर्ष आणि लढा आधुनिक ॲक्शन थ्रिलरच्या रूपात मांडला आहे. जेव्हा एका आईकडून तिचे मूल हिरावून घेतले जाते, तेव्हा ते परत मिळवण्यासाठी ती कोणत्या थराला जाऊ शकते, हे या सिनेमात पाहायला मिळतं.
‘गांधारी’ चित्रपट ३ सप्टेंबर २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तापसी पन्नूबरोबर ईश्वक सिंह, छाया कदम, स्वस्तिका मुखर्जी, मिता वशिष्ठ, जतीन सरना, प्रशांत नारायणन व चंदन रॉय हे कलाकारही आहेत.
