‘देसी ब्लिंग’ सध्या चर्चेत आलं आहे याचं कारण सतीश सनपाल आणि तबिंदा सनपाल यांची होणारी चर्चा. तबिंदा सनपालने पती सतीशबाबत एक विधान केलं आहे. ज्यानंतर तबिंदाला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. मी रोज सकाळी उठून माझ्या पतीचे म्हणजेच सतीशचे पाय चेपून देते असंही तबिंदाने म्हटलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत.
नेटफ्लिक्सवरचा शो देसी ब्लिंग चर्चेत
नेटफ्लिक्सवर सुरु असलेला देसी ब्लिंग हा शो चर्चेत आला आहे. सतीश सनपालने म्हटलं आहे की मला ठाऊक हे की पैसा म्हणजे देव नाही. पण मी एखाद्या देवापेक्षा कमी नाही. माझ्याकडे मुली पाहतात, आकर्षित होतात तर मला छान वाटतं. यानंतर तबिंदा सनपाल म्हणजेच सतीशची पत्नी असं म्हणाली की सतीश दुसऱ्या मुलींसह, महिलांसह पार्टी करतो, त्याला ते आवडतं. सतीशला ते सगळं आवडतं तो ते करतो. मी त्याच्यावर जळायची, पण त्याच्यावर विश्वास होता.

मला सतीश दर दिवाळीला देतो तीन किलो सोनं
तबिंदा म्हणाली, सतीश जेव्हा वेगवेगळ्या महिलांसह पार्टी करतो, मला त्याबाबत काहीच अडचण नाही. मला त्रास याचा होतो की एका वेळी फक्त वारंवार एकाच महिलेसह जर त्याने वेळ घालवला तर. कारण यामुळे हे संकेत मिळतात की त्यांच्यात काहीतरी भावनिक नातं तयार झालंय. तो संपूर्ण रात्रभर जरी दुसऱ्या महिलांसह राहिला तरीही मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे ४० किलो सोनं आहे. सतीश दरवर्षी दिवाळीतल्या धनत्रयोदशीला मला तीन किलो सोनं भेट देतो. मी रोज सकाळी उठून सतीशचे पाय चेपून देते, त्याच्या पायांना मालिश करुन देते. सतीश एखाद्या राजकुमाराप्रमाणे आयुष्य जगतो. मला ते खूपच आवडतं असं तबिंदाने म्हटलं आहे. तबिंदाच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
फिल्ममेकर लक्ष्मी अय्यर यांनी काय म्हटलं आहे?
तबिंदाचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर फिल्ममेकर लक्ष्मी अय्यर म्हणाल्या, “मी एका रिअॅलिटी शोची क्लिप पाहिली. ज्यात एक पत्नी तिच्या पतीबाबत म्हणते त्याने माझी फसवणूक केली तरी हरकत नाही, तो कसाही वागला, छंदीफंदी असला तरीही चालेल. कारण तो मला दर दिवाळीला सोनं भेट देतो. मला फक्त एवढंच वाटतं की एकच महिला असू नये, अनेक महिला असाव्यात. तिचं हे म्हणणं अत्यंत बकवास आहे. मॉडर्न किंवा कूल म्हणवण्याच्या नादात असली गलिच्छ बकवास बंद करा. पती तुमच्याशी प्रामाणिक असणं, इमानदार असणं यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही.” लक्ष्मी अय्यर यांनी इन्स्टाग्रमावर पोस्ट लिहून तबिंदाला सुनावलं आहे.
कोण आहे तबिंदा सनपाल?
तबिंदा सनपाल ब्रिटिश पाकिस्तानी आंत्रप्रेनर आहे. Anax Capital Asset Management ची संस्थापकही आहे. तबिंदा सनपालला तिच्या आलिशान राहणीसाठी ओळखलं जातं. तबिंदा सनपाल दुबईच्या कॉर्पोरेट विश्वातलंही मोठं नाव आहे. तिने तिची स्वतंत्र ओळख तयार केली आहे. लंडनमध्ये तिने बिझनेस आणि फायनान्स या विषयांचं शिक्षण घेतलं आहे. दुबईतल्या प्रभावी व्यावसायिक महिलांमध्ये तिची गणना होते. सतीश एक आलिशान आयुष्य जगतो आणि मला त्याचा अभिमान आहे. आमच्या मुलीचं नाव बेला आहे. बेलाच्या जन्माच्या आधी तिच्यासाठी सतीशने सोन्याची भांडी तयार करुन घेतली होती. त्यामुळे बेलाकडे तिची सोन्याची थाळी, सोन्याचा पेला, सोन्याचा चमचा आहे. आज घडीला ती दुबईतली सर्वात श्रीमंत मुलगी आहे असं तबिंदा सनपालने सांगितलं.
सतीश सनपाल कोण आहे?
सतीश सनपाल दुबईत राहणारे भारतीय व्यावसायिक आहेत. सतीश सनपाल मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी आहेत. वयाच्या १५ व्या वर्षी ८० हजार रुपये घेऊन सतीश सनपाल दुबईला आला, त्यानंतर तो तिथेच स्थायिक झाला. त्याने आता आता ANAX Holding नावाने स्वतःचं साम्राज्य तयार केलं आहे. या कंपनीचा तो संस्थापक आणि संचालक आहे. त्याच्याकडे आता ८ हजार कोटींची संपत्ती आहे अशी चर्चा आहे. तर त्याच्या बिझनेस ग्रुपचा टर्न ओव्हर २५ हजार कोटींचा आहे असंही सांगितलं जातं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. सतीश सनपाल हा संयुक्त अरब आमिरातमधला अब्जाधीश आहे. विशेष बाब म्हणजे तो फक्त आठवीपर्यंत शिकला आहे. त्यानंतर त्याने शाळा सोडून दिली. आता सतीश सनपाल हा बुर्ज खलिफातल्या त्याच्या आलिशान घरात पत्नी तबिंदा सनपालसह राहतो. सतीशने सांगितलं होतं की मी दुबईत आलो तेव्हा माझ्याकडे इथल्या चलनाप्रमाणे १० लाख दिरम होते. त्यानंतर मी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी यशस्वी झालो आता मी दुबईतला अब्जाधीश आहे. माझ्या पत्नीचं नाव तबिंदा आहे. आमच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत आणि आम्हाला एक मुलगी आहे. आम्ही आमच्या संसारात खूप आनंदी आहोत.
