Netflix Most Watch Hindi Web Series : इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेली वेब सीरिज ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ने नेटफ्लिक्सवर इतिहास रचला आहे. या शोने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी भारतीय सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘हीरामंडी’ला देखील मागे टाकलं आहे. ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही जगभरातील नेटफ्लिक्सवरील नंबर वन नॉन-इंग्लिश सीरिज ठरली आहे. या सीरिजची जगभरात जोरदार चर्चा आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे.

नेटफ्लिक्सच्या अधिकृत डेटा प्लॅटफॉर्म, टुडमवर प्रदर्शित झालेल्या टॉप शो आणि चित्रपटांच्या यादीनुसार, नीरज पांडे निर्मित आणि दिग्दर्शित तस्करी १२ ते १८ जानेवारी दरम्यान नॉन इंग्लिश शोजच्या जागतिक यादीत पहिल्या क्रमांकावर राहिली. या काळात सीरिजला ५.४ मिलियन व्ह्यूज आले. एका आठवड्यात इतके व्ह्यूज येणं ही कोणत्याही भारतीय सीरिजसाठी मोठी कामगिरी आहे. तस्करीने अनेक आंतरराष्ट्रीय हिट्स सीरिजना मागे टाकलं आहे. या यादीत कोरियन रोमँटिक कॉमेडी ‘कॅन दिस लव्ह बी ट्रान्सलेटेड?’ ४ मिलियन व्ह्यूजसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, १६ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या कोरियन शोने तस्करीच्या एका आठवड्यांच्या तुलनेत फक्त तीन दिवसांत इतके व्ह्यूज मिळवले.

‘तस्करी’ने फक्त कोरियन ड्रामा नाही तर अनेक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय शोला मागे टाकलं आहे. यात ‘जुजुत्सु कायसेन सीझन 3’ (२.८ मिलियन व्ह्यूज), ‘अल्फा मेल्स’ (२.८ मिलियन व्ह्यूज) आणि ‘द क्वीन ऑफ फ्लो’ (२.५ मिलियन व्ह्यूज) या शोचा समावेश आहे. या टॉप १० शोच्या यादीत ‘तस्करी’ व्यतिरिक्त कोणताही भारतीय शो नाही.

इमरान हाश्मीची प्रतिक्रिया

इमरान हाश्मीने शोच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तस्करी ही सीरिज विमानतळांवर दिवसरात्र काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल आहे, असं इमरान म्हणाला. त्याच्या मते, सीरिजचा प्रामाणिक दृष्टिकोन हा सीरिजचा आत्मा आहे आणि प्रेक्षकांमध्ये तो खोलवर रुजला आहे. नेटफ्लिक्सच्या ग्लोबल नॉन-इंग्लिश टॉप १० यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली सीरिज ठरली, हा एक अतिशय समाधानकारक अनुभव आहे. संपूर्ण टीमने यासाठी कठोर मेहनत घेतली आहे, असं इमरान हाश्मीने नमूद केलं.