ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन चित्रपट व वेब सीरीज येत असतात. ओटीटीवरील टॉप १० ट्रेंडिंगमध्ये सहसा नव्या प्रदर्शित झालेल्या सीरीज किंवा चित्रपटच पाहायला मिळतात. मात्र, सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप १० लिस्टमध्ये ६ महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेली एक थ्रिलर वेब सीरीज अजूनही टिकून आहे. ७ भागांच्या या सीरीजला आयएमडीबीने ७.१ रेटिंग दिले आहे. ही सीरीज प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रिय ठरली की, ६ महिने उलटूनही प्रेक्षक ती आवडीने पाहत आहेत. ही सीरीज म्हणजे इमरान हाश्मीची ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ (Taskari: The Smugglers Web) आहे. ही सीरिज १४ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

भारतात नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग असलेल्या टॉप १० सीरिज

नेटफ्लिक्स इंडियाच्या टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये खालील सीरीजचा समावेश आहे:
१. टीच यू अ लेसन (कोरियन स्कूल ड्रामा)
२. द वंडरफूल्स (साउथ कोरियन कॉमेडी फँटसी ड्रामा)
३. मायकल जॅक्सन: द वर्डिक्ट (डॉक्युमेंट्री थ्रिलर)
४. बर्लिन अँड द लेडी विथ एन अरमाइन (आर्ट क्राईम सीरीज)
५. देसी ब्लिंग (रिअॅलिटी शो)
६. द बोरोस (मॉन्स्टर ड्रामा)
७. ग्लोरी (स्पोर्ट्स ड्रामा)
८. रॉ (RAW)
९. मामला लीगल है: सीझन २
१०. तस्करी: द स्मगलर वेब

‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ कशाबद्दल आहे?

नीरज पांडे दिग्दर्शित ७ भागांची ही थ्रिलर सीरिज आंतरराष्ट्रीय तस्करीच्या नेटवर्कवर आधारित आहे. या कथेत कोडेड रूट्स, बनावट कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या क्लृप्त्या दाखवण्यात आल्या आहेत. या सीरिजमध्ये अल-डेरा, अदिस अबाबा, मिलान आणि बँकॉक यांसारख्या ठिकाणचे मोठे तस्करीचे मार्ग यात पाहायला मिळतात. ही संपूर्ण कथा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका विशेष कस्टम्स टास्क फोर्सच्या अवतीभवती फिरते. या टीमचे नेतृत्व प्रामाणिक आणि कडक अधिकारी अर्जुन मीणा (इमरान हाश्मी) करतात. या टीममध्ये मिताली कामथ (अमृता खानविलकर), रविंदर गुज्जर (नंदीश सिंह संधू) आणि प्रकाश कुमार (अनुराग सिन्हा) यांचा समावेश आहे.

सीरिजसाठी इमरान हाश्मीने लगेच दिला होता होकार

अभिनेता इमरान हाश्मीने ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ या वेब सीरीजच्या प्रमोशनदरम्यान सांगितलं होतं की, स्क्रिप्ट वाचल्यावर त्याने लगेचच या सीरिजसाठी होकार दिला होता. कथेचे नॅरेशन ऐकल्यानंतर त्याला ४-५ भाग वाचायला दिले होते आणि ते वाचून तो खूप प्रभावित झाला होता. “कस्टम ऑफिसरची भूमिका साकारणे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव आहे. माझ्यासाठीच नाही, तर कोणत्याही अभिनेत्यासाठी हे जग नवीन आणि वेगळे आहे. आपल्या चित्रपट किंवा सीरीजमध्ये आतापर्यंत तस्करीचे हे जग इतक्या चांगल्या पद्धतीने कधीच दाखवले गेले नाही. जेव्हा कथा नवीन असते, तेव्हा प्रेक्षकांना एक वेगळे जग आणि नवीन अनुभव देण्याची संधी मिळते,” असं इमरान हाश्मी म्हणाला होता.