ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता लोकांमध्ये सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता चित्रपट निर्माते आणि दिग्गज कलाकारही ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये रस दाखवत आहेत. सध्या ओटीटीवर टीव्हीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीची सीरिज खूप चर्चेत आहे. यामध्ये एका बॉलीवूड अभिनेत्यानेही मुख्य भूमिका साकारली आहे. ही एक रोमँटिक सीरिज आहे. मोठ्या पडद्यावर ‘सैयारा’सारख्या रोमँटिक चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती, आणि आता ओटीटीवरही अशाच प्रकारच्या एका दमदार सीरिजने धुमाकूळ घातला आहे. चला तर मग या सीरिजबद्दल जाणून घेऊया.

ही सीरिज ६ एपिसोड्सची आहे. या सीरिजचं नाव आहे ‘सायको सैयां’. या सीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. ही रंजक सीरिज तुम्ही वीकेंडला पाहू शकता. या सीरिजमध्ये मराठमोळी टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये तेजस्वी प्रकाशने तिच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे.

तेजस्वी प्रकाशची ‘सायको सैयां’ (Psycho Saiyaan) सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. कमी भागांची संख्या आणि जबरदस्त कथानक यामुळे ही सीरिज आता ‘मस्ट वॉच’ आहे. या सीरिजमध्ये तेजस्वी प्रकाशने खूप सारे रोमँटिक सीन्स दिले आहेत. तेजस्वी प्रकाश व रवी किशन यांचे रोमँटिक सीन सध्या व्हायल होत आहेत. दोघांच्या वयात २४ वर्षांचे अंतर आहे. अनेक हिट मालिकांमध्ये काम करणाऱ्या तेजस्वीने या सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारली आहे.

‘सायको सैयां’ सीरिजची कथा

ही कथा उज्जैनमधील कार्तिक (अनुद सिंह ढाका) नावाच्या एका तरुणाभोवती फिरते, जो चारूच्या (तेजस्वी प्रकाश) प्रेमात वेडा असतो. हळूहळू त्याचे हे प्रेम धोकादायक होत जाते. नंतर यात एका गँगस्टरची (हंट्री चौहान – रवी किशन) एन्ट्री झाल्यावर कथेत मोठा ट्विस्ट येतो.

तेजस्वी प्रकाश, अनुद सिंह ढाका, रवी किशन, सुरभी चंदना, सृष्टी श्रीवास्तव, अश्विनी काळसेकर आणि यशपाल शर्मा यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही सीरिज प्रामुख्याने उज्जैन आणि कटनी या शहरांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि कथेचा शेवट जॉर्जियामध्ये होतो. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यापासून ही सीरिज तिच्या थरारक कथानकामुळे आणि तेजस्वी प्रकाश व रवी किशन यांच्या अभिनयामुळे चर्चेत आहे. ही सीरिज तुम्ही ‘ॲमेझॉन एमएक्स प्लेयर’वर मोफत पाहू शकता.