The Scam Leaked Teaser : NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आणि कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची संपूर्ण देशामध्ये चर्चा असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण हे चर्चेमध्ये आले असून यासंबंधित लोकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. आता या पेपरफुटीवर आधारित ओटीटीवर सीरिज प्रदर्शित होणार आहे. ‘द स्कॅम-लीक्ड’ या सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन सुरू असताना ‘झी ५’ ने नव्या सीरिजची घोषणा केली आहे. ‘द स्कॅम-लीक्ड’ असे या सीरिजचे नाव असून त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या एक मिनिटाच्या या टीझरमध्ये विद्यार्थ्यांची व्यथा आणि त्याचे धक्कादायक परिणाम दाखवण्यात आले आहेत. मेडिकल पेपरची छपाई आणि त्यानंतर हे पेपर कशाप्रकारे फोडले जातात आणि यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान दाखवण्यात आले आहे.

‘द स्कॅम-लीक्ड’ टीझरमध्ये काय आहे?

या टीझरमध्ये दाखवण्यात आले, कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका प्रिंटिंग प्रेसमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छापण्याचे काम सुरू असते. अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि कडेकोट बंदोबस्तामध्ये प्रश्नपत्रिका छापल्यानंतर त्यावर ‘गोपनीय’ (Confidential) असा शिक्कादेखील मारला जातो. मात्र, तरीही नंतर ते पेपर कशा पद्धतीने व्हायरल केले जातात हे दाखवण्यात आले आहे. बॉक्समध्ये भरलेल्या प्रश्नपत्रिका या व्हॅनमधून पुढच्या ठिकाणी पाठवल्या जातात. मात्र, याचवेळी एक व्यक्ती गुपचूप प्रश्नपत्रिकेच्या काही प्रती दुसऱ्या व्यक्तीकडे देतो. त्यानंतर ती व्यक्ती घाईघाईने त्या प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ऑनलाइन पद्धतीने पुढे पाठवत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

यानंतर पुढे टीझरमध्ये विविध न्यूज चॅनेलवर नीट पेपरफुटी प्रकरणाच्या ब्रेकिंग न्यूज झळकताना दिसतात. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच अंगावर काटा आणणारे दृश्य दाखवण्यात आले आहे. ही बातमी लक्षात येताच रिकामे वर्ग आणि भयाण शांतता पसरलेली दाखवण्यात आली आहे. इतक्यात अचानक मोबाईलची रिंग वाजते. वडिलांचा फोन येत असताना एका विद्यार्थ्याने या घटनेमुळे आत्महत्या करून जीवन संपवल्याचे दाखवण्यात आले आहे. टीझरच्या या शेवटच्या भावनिक आणि धक्कादायक सीनमुळे या सीरिजची तीव्रता लक्षात येत आहे.

‘झी ५’ने ही सीरिज रिलीज करत एक खास संदेश लिहिला आहे. “एक पेपर, लाखो स्वप्ने, एक लीक, अवाक् झालेला देश, ‘द स्कॅम: लीक्ड’ (The Scam: Leaked) – लवकरच Zee5 वर!, असे लिहित टीझर रिलीज करण्यात आला आहे. सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, ही सीरिज कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, या सीरिजच्या जबरदस्त टीझर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयामुळे या सीरिजबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.