The Sixth Sense Horror Movie: हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जागतिक सिनेसृष्टीतील सर्वात भीतीदायक आणि चर्चा झालेला चित्रपट ‘द सिक्स्थ सेन्स’ सध्या ओटीटीवर ट्रेंड होत आहे. एम. नाईट श्यामलन यांच्या लेखणीतून उतरलेला हा चित्रपट केवळ भीतीच नाही तर मानवी मनाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकतोत. ब्रूस विलिस आणि हेली जोएल ओसमेट यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका अशा मुलाची कथा सांगतो, ज्याला मेलेली माणसं दिसतात. ८.२ IMDB रेटिंग असलेला हा चित्रपट ६ ऑस्कर नामांकनांचा मानकरी ठरला असून, याचा शेवटचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना आजही थक्क करतो.
या चित्रपटाचे नाव ‘द सिक्स्थ सेन्स’ (The Sixth Sense) आहे. १ तास ४७ मिनिटांचा हा हॉलीवूड भयपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन एम. नाईट श्यामलन यांनी केले आहे. यात ब्रूस विलिस, हेली जोएल ओसमेट आणि टोनी कोलेट यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा आणि भीतीदायक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. सध्या हा चित्रपट ओटीटीवर चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट तुम्ही घरबसल्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता, ते जाणून घेऊया.
‘द सिक्स्थ सेन्स’ची चित्रपटाची कथा
‘द सिक्स्थ सेन्स’ या भयपटाची कथा मॅल्कम क्रो आणि लहान मुलगा कोल सियर यांच्याभोवती फिरते. मॅल्कम हा एक ‘चाइल्ड सायकॉलॉजिस्ट’ आहे, जो मुलांच्या मनातील भीती समजून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, विंसेट नावाचा त्याचा एक जुना रुग्ण त्याच्यावर हल्ला करतो, ज्यामुळे मॅल्कमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.
काही काळानंतर मॅल्कमची भेट कोलशी होते. कोल नेहमी घाबरलेला आणि दडपणाखाली असतो. मॅल्कम त्याला समजून घेण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण कोल सुरुवातीला काहीच सांगत नाही. हळूहळू जेव्हा तो मॅल्कमवर विश्वास ठेवू लागतो, तेव्हा एक असं रहस्य समोर येते जे सर्व काही बदलून टाकते. कारण कोलला मेलेली माणसं दिसू लागतात.
‘द सिक्स्थ सेन्स’ हा चित्रपट १९९९ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटाला ६ ऑस्कर नामांकनं मिळाली होती. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट संपादन यांचा समावेश होता.
ओटीटीवर कुठे पाहायचा चित्रपट?
१ तास ४७ मिनिटांचा हा भयपट तुम्ही घरबसल्या अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटाला IMDB वर ८.२ रेटिंग मिळाले आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि थरारक पाहायचं असेल, तर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
