टाटा कुटुंब हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह उद्योगघराण्यांपैकी एक मानलं जातं. उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबरोबरच समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रनिर्माणासाठी दिलेल्या योगदानामुळे टाटा समूहाला विशेष सन्मान मिळतो. प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि उत्तम नेतृत्व ही टाटा कुटुंबाची ओळख मानली जाते.अशातच आता या कुटुंबावर आधारित सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’च्या यशानंतर टी-सीरिज फिल्म्स आणि ऑलमायटी मोशन पिक्चर यांनी पुन्हा एकदा एकत्र कलाकृतीची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून, ‘द टाटाज’ नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. या सीरिजसाठी पटकथालेखक करण व्यास यांची निवड करण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘The Tatas: How a Family Built a Business and a Nation’ या पुस्तकावर आधारित ही सीरिज असणार आहे. ‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’च्या लेखनासाठी करण व्यास यांचं मोठं कौतुक झालं होतं. आता तेच टाटा कुटुंबाच्या प्रेरणादायी प्रवासाला पडद्यावर साकारण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘द टाटाज’ ही ४ पिढ्यांचा प्रवास उलगडणारी भव्य सीरिज असेल. या सीरिजमध्ये टाटा कुटुंबाची उद्योगनीती, औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी आणि समाजहितासाठी उभारलेल्या संस्थांचा प्रवास दाखवला जाणार आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत टाटा कुटुंबाने बजावलेली महत्त्वाची भूमिका आणि त्यांचा वारसा या सीरिजमध्ये प्रभावीपणे मांडला जाणार आहे.

‘द टाटाज’ ही सीरिज केवळ उद्योगविश्वातील घडामोडींवर मर्यादित राहणार नाही. दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा वैयक्तिक प्रवास, त्यांचे विचार, ठाम भूमिका आणि बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत त्यांनी घेतलेले निर्णय यांचेही भावनिक आणि जवळून चित्रण या सीरिजमध्ये करण्यात येणार आहे.

रचनात्मकदृष्ट्या ही सीरिज टाटा कुटुंबाच्या चार वेगवेगळ्या पिढ्यांचा प्रवास दाखवणार आहे. यात संस्थापक जमशेतजी नुसरवानजी टाटा, उद्योगसमूहाला बळकटी देणारे सर दोराबजी टाटा, सर रतन टाटा आणि मेहरबाई टाटा, आधुनिकतेची दिशा देणारे जे. आर. डी. टाटा तसेच टाटा समूहाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे रतन नवल टाटा यांच्या कार्याचा आणि योगदानाचा मागोवा या सीरिजमधून घेण्यात येणार आहे.

टी-सीरिज फिल्म्सचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, “द टाटाज ही सीरिज सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. अनेक पिढ्यांना आपल्या दूरदृष्टी आणि मूल्यांनी प्रेरित करणाऱ्या टाटा कुटुंबाची ही कथा आहे. मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरीला प्रेक्षकांनी जसं भरभरून प्रेम दिलं, तसंच प्रेम या सीरिजलाही मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.” याबाबत पटकथालेखक करण व्यास म्हणाले, “टाटा कुटुंबाच्या इतिहासाचा जितका सखोल अभ्यास केला, तितकं मला जाणवलं की ही केवळ एका उद्योगसमूहाची कहाणी नाही. ही आधुनिक भारताच्या जडणघडणीची पायाभरणी करणारी एक महत्त्वपूर्ण कथा आहे.”

करण व्यास पुढे म्हणाले, “टाटा कुटुंबातील सदस्यांनी केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीकडे पाहिले नाही, तर समाजाच्या हितासाठी विविध संस्था उभारण्यावर भर दिला. ऑलमायटी मोशन पिक्चरबरोबर काम करताना आम्हाला ही कथा तिच्या भव्यतेला साजेशा पद्धतीने मांडण्याची संधी मिळाली.” दरम्यान ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याला खूप वेळ असून रिलीज डेटही इतक्यात जाहीर झालेली नाही.