The Traitors Season 2 trailer: नुकतेच ‘अलायन्स’ आणि ‘लॉकअप’ हे रिअॅलिटी शो संपले आहेत. मिनी माथूर अलायन्सची विजेती ठरली आहे; तर ‘लॉकअप’ची विजेती श्रेया कालरा ठरली आहे. आता दोन शो संपले तर आणखी काही रिअॅलिटी शो सुरू झाले आहेत. ‘ट्रेटर’ या शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘ट्रेटर २’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये कोण-कोण सहभागी होणार आहे हे टीझरमध्ये उघड झाले आहे. मल्लिका शेरावत, रिया चक्रवर्ती, मुन्नवर फारुकी, श्वेता तिवारी, पारुल गुलाटी, अभिषेक मल्हान असे अनेक कलाकार यात दिसणार आहेत.

श्वेता तिवारी काय म्हणाली?

ट्रेलरच्या सुरुवातीला करण जोहरचा आवाज ऐकायला मिळतो. तो म्हणतो, “या पॅलेसमध्ये पुन्हा एकदा २१ चलाख स्पर्धक येणार आहेत. त्यांच्यात काही ट्रेटर्स लपलेले असणार आहेत.” पुढे तो स्पर्धकांना म्हणतो, “मागचा सीझन पाहिल्यानंतरही शोमध्ये येण्याची हिंमत केलीत, तुमच्यामध्ये धाडस आहे.” त्यानंतर भयावह संगीत ऐकायला मिळते.

मुन्नवर म्हणतो, “यामध्ये तुम्हाला खोटं वागायचं आहे, ते खूप अवघड आहे.” मल्लिका म्हणते, “या खेळात खरे बोलणे गरजेचे नाही, तुम्हाला इतरांना गोष्टी पटवून देता आल्या पाहिजेत.”

पुढे करण जोहर श्वेताला म्हणतो, “तू खोटं पकडू शकत नाहीस.” त्यावर श्वेता म्हणते, “माझ्या पतींना चीट करताना म्हणजेच फसवताना मीच पकडलं होतं.” त्यावर क्रिस्टल डिसूजा आश्चर्याने काय असे म्हणताना दिसत आहे. ती असेही म्हणते, “इथे मी कशी राहीन हे मला माहीत नाही. “

या ट्रेलरमध्ये पुढे भांडणे होताना दिसत आहेत. स्पर्धक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. रिया म्हणते, “हा एपिसोड कधी प्रदर्शित होणार आहे हे सांगा, मी भारत सोडून निघून जाईन.” करण जोहर शेवटी म्हणतो, “इथे विश्वास खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो, पण धोका सगळीकडे पाहायला मिळत आहे.” या शोमध्ये २१ स्पर्धक असणार आहेत, ज्यांचे दोन ग्रुप असणार आहेत.

आता या सगळ्यात श्वेता तिवारीच्या वक्तव्याची चर्चा होत असल्याचे दिसत आहे. तिने १९९८ मध्ये राजा चौधरी यांच्याबरोबर लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आहे. २०१२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला, त्यानंतर श्वेताने २०१३ मध्ये अभिनव कोहलीबरोबर लग्न केले. त्यांना २०१६ मध्ये मुलगा झाला. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.