The Trauma Code Heroes on Call Netflix : ओटीटी हे सध्याच्या काळातील मनोरंजनाचे प्रमुख माध्यम आहे. दर आठवड्याला नवीन शो व चित्रपट ओटीटीवर रिलीज होतात. आणि एका क्लिकवर प्रेक्षकांना जगभरातील त्यांचे आवडते शो, चित्रपट आणि के-ड्रामा पाहायला मिळतात. कोरियन ड्रामाचे भारतातही खूप चाहते आहेत. के-ड्रामा आपल्या कथा, अभिनय आणि उत्तम सिनेमॅटोग्राफीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. अशीच एक ८ एपिसोडची कोरियन सीरिज नेटफ्लिक्सवर आल्यापासून तुफान गाजत आहे. या सीरिजचे नाव ‘द ट्रॉमा कोड: हिरोज ऑन कॉल’ (The Trauma Code: Heroes on Call) असे आहे.

जानेवारी २०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेली ‘द ट्रॉमा कोड’ ही मेडिकल ड्रामा सीरिज अवघ्या एका वर्षात जगभरात हिट ठरली आहे. ती जवळपास २६ हून अधिक देशांमध्ये टॉप ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत आहे. तुम्ही ही सीरिज पाहिली नसेल, तर या वीकेंडला नक्की पाहू शकता. या सीरिजची कथा, त्याचे रेटिंग आणि कलाकार याबद्दल जाणून घेऊयात.

द ट्रॉमा कोड सीरिजची कथा

‘द ट्रॉमा कोड: हिरोज ऑन कॉल’ या सीरिजची कथा दमदार आहे. त्याचबरोबर तिची मांडणीही उत्तम पद्धतीने करण्यात आली आहे. ८ एपिसोडच्या या ड्रामामध्ये ट्रॉमा सेंटरमधील आयुष्याची लढाई आणि एका अत्यंत हुशार व निडर सर्जनची कथा दाखवली आहे. हा सर्जन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावतो. ही मालिका ‘ट्रॉमा सेंटर: गोल्डन अवर’ या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे.

अभिनेता जू जी-हून याने यात डॉ. बेक कांग-ह्युक या धडाडीच्या सर्जनची भूमिका साकारली आहे. गंभीर शस्त्रक्रियेच्या प्रसंगांमध्येही ही सीरिज कंटाळवाणी वाटत नाही. अतिशय हलक्या-फुलक्या स्वरुपाची ही सीरिज आहे. तसेच फक्त ८ एपिसोड्स असल्याने कथा कुठेही लांबवलेली वाटत नाही.

सीरिजला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग

सीरिजला आयएमडीबीवर तब्बल ८.४ रेटिंग मिळाले आहे. यावरूनच ही मालिका प्रेक्षकांना किती आवडली आहे, ते दिसून येतं. विशेष म्हणजे आतापर्यंत या सीरिजचा फक्त एकच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये याचा दुसरा व तिसरा सीझन रिलीज होईल, अशी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.