Tumbadchi Manjula OTT Premier Details : ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भन्नाट विनोद, अनपेक्षित ट्विस्ट आणि भावनिक कथा असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिस गाजवल्यावर अन् समीक्षकांची प्रशंसा मिळाल्यावर आता ‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विविध कोरगावकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भूतकर, मकरंद अनासपुरे, सई तम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांसह अनेक लोकप्रिय कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ७ ऑगस्टला Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे. “थरार, धमाल आणि संकटात अडकलेलं गाव! कारण इथे प्रत्येकाच्या ओठांवर फक्त ‘मंजुळा’चं नाव!” असं कॅप्शन देत टीमने सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

‘तुंबाडची मंजुळा’चं कथानक नेमकं काय आहे?

गावात राहणारा केशव अडचणीत सापडतो आणि पकडलं जाण्याच्या भीतीने स्वतःवर भूताची सावली आहे असं भासविण्यास सुरुवात करतो. त्याला मंजुळा नावाच्या महिलेच्या आत्म्याने झपाटलंय असं तो भासवतो. ही बातमी संपूर्ण गावात पसरते आणि सुरू होतो गोंधळ…गावातील प्रतिष्ठीत रवी आणा (जितेंद्र जोशी) आणि त्याचा साथीदार यावर उपाय म्हणून करुणाकर महाराज (मकरंद अनासपुरे) नावाच्या भोंदू बाबांना बोलावतात. शेवटी या सगळ्याशी शोभाचा (सई ताम्हणकर) संबंध कसा जोडला जातो हे तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल.

दिग्दर्शक विविध कोरगांवकर सांगतो, “आमच्या सिनेमाला चित्रपटगृहांमध्ये जे काही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं त्यामुळे मी खरंच भारावून गेलो. मला आनंद आहे की, आता सगळ्या प्रेक्षकांना मराठी Zee5 वर ‘तुंबाडची मंजुळा’ घरबसल्या पाहता येईल.”

सई ताम्हणकर म्हणते, “तुंबाडची मंजुळा’ सिनेमाबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही कथा विनोदी, भयपट आणि भावना यांच्यात किती सहजतेने फिरते. ही एक अशी कथा आहे जी प्रेक्षकांना विचार करायला लावते आणि सर्वांचं निखळ मनोरंजन करते. मराठी Zee 5 वर प्रेक्षक त्यांच्या कुटुंबीयांसमवेत या चित्रपटाचा आनंद घेतील, यासाठी मी उत्सुक आहे.”

चित्रपटातील गावकऱ्यांमध्ये एकापेक्षा एक अतरंगी कलाकार असून यामध्ये जितेंद्र जोशी, ओम भूतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, प्रियल नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे. दरम्यान, आता ७ ऑगस्टला Zee 5 वर ‘तुंबाडची मंजुळा’चा ग्रँड प्रीमियर होणार आहे.