ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय शो 'पिचर्स'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; या दिवशी होणार प्रदर्शित |tvf most popular and most awaited web series in india pitchers season 2 is coming soon | Loksatta

ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘पिचर्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; या दिवशी होणार प्रदर्शित

तब्बल ७ वर्षांनी या लोकप्रिय सिरिजचा दूसरा सीझन येत आहे

ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘पिचर्स’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा; या दिवशी होणार प्रदर्शित
पिचर्स सीझन २ (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

आज जरी ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट झाला असला तरी एक काळ असा होता जेव्हा भारतीयांसाठी युट्यूब हा एकमेव ओटीटी प्लॅटफॉर्म होता. जगभरात घडणाऱ्या घडामोडींबद्दल यावर माहिती हमखास मिळायची. याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ‘टीव्हीएफ – द व्हायरल फिव्हर’ हा ब्रॅंड उदयास आला आणि आज तो प्रचंड मोठा झाला आहे. याच ‘टीव्हीएफ’ने एकेकाळी त्यांच्या काही वेबसीरिज मोफत युट्यूबवर प्रदर्शित केल्या आणि त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यापैकीच एक लोकप्रिय वेबसीरिज म्हणजे ‘पिचर्स’.

आजही तरुणाईत या वेबसीरिजची प्रचंड क्रेझ आहे. तब्बल ७ वर्षांनी या लोकप्रिय सिरिजचा दूसरा सीझन येत आहे. त्याकाळात आणि आजही ‘स्टार्ट-अप’ या शब्दाभोवती जे वलय निर्माण झालं आहे त्याबद्दलचे गैरसमज दूर करणारी आणि भारतीय तरुणाईमध्ये उद्योजिकता म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं? याबद्दल ही सीरिज भाष्य करते. २०१५ साली या सिरिजचा पहिला सीझन आला आणि लोकांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतला. नवीन कस्तुरिया, अरुणभ कुमार, जितेंद्र कुमार, अभय महाजन यांची कामं प्रेक्षकांना खूप पसंत पडली.

आणखी वाचा : निर्माते राज कुमार बडजात्या यांची ‘ही’ होती शेवटची इच्छा; आठवण सांगताना सचिन पिळगांवकरांना अश्रू अनावर

नुकताच याच्या पुढच्या सीझनची घोषणा झाली आहे आणि याचा टीझरसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. नवीन कस्तुरिया, अरुणभ कुमार, अभय महाजनबरोबरच आता अभिषेक बॅनर्जी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जितेंद्र कुमार यांच्याबद्दल अजून खुलासा झालेला नाही, पण प्रेक्षक त्यालाही या नव्या सीझनमध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.

याबद्दल बोलताना अरुणभ कुमार म्हणाला, “या वेबसीरिजला भारतात जे प्रेम मिळालं आहे त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. पहिल्या सीझनपासून याचे चाहते याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातून प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.” ‘पिचर्स’चा हा नवा सीझन नाताळच्या मुहूर्तावर ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 08:50 IST
Next Story
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत