Umesh Kamat on Settle in Abroad: सध्या अनेक मराठी चित्रपट, वेब सीरिज, नाटके आपल्या भेटीला येत आहेत. ३ एप्रिल २०२६ रोजी ‘सुपर डुपर’ आणि सखे गं साजणी हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

ओटीटीवर विविध चित्रपटांबरोबरच अनेक उत्तमोत्तम वेब सीरिजदेखील प्रदर्शित होतात. नुकतीच उमेश कामत व प्रिया बापट यांची हे काय नवीन ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी ५ मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या वेब सीरिजचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे.

“भारताबाहेर गेलेल्यांचे मला…”

या सगळ्यात उमेश कामतने एका मुलाखतीत विदेशात स्थायिक होण्याबद्दल त्याचे मत काय आहे, हे सांगितले. उमेश कामत व प्रिया बापट यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत उमेश कामत म्हणाला, “भारताबाहेर जाऊन, एका वेगळ्या देशात जाऊन मी सेटल होईन किंवा तिथे जाऊन माझा संसार थाटेन, हा मी विचारच करू शकत नाही. भारताबाहेर गेलेल्यांचे मला कौतुक वाटते. माझा स्वत:चा भाऊ भारताबाहेर स्थायिक झालेला आहे; पण मी हा विचारच करू शकत नाही. मी भारताबाहेर जाऊन राहूच शकत नाही. कामापुरते तसेच फिरण्यासाठी फक्त जाऊ शकतो. पण, स्थायिक होणार नाही.”

Award Banner

“तेव्हा मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की…”

पुढे तो म्हणाला, “जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. तेव्हा प्रिया शिकत होती. त्यादरम्यान कधीतरी एकदा प्रियाच्या मनात विदेशात स्थायिक होण्याचा विचार आला होता. ती मला म्हणाली होती की भारताबाहेर जाऊन राहायला किती मजा येईल ना? तिकडे काम असेल, मला तिकडे जायला आवडेल. त्यावेळी मला धडधड झाली होती. आपला निर्णय चुकला की काय, असे वाटले होते. अर्थातच, तेव्हा मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुला जायचं असेल, तर तू जा. मी येणार नाही. एक वेळ लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मला चालेल; पण मी तिकडे स्थायिक होणार नाही. मी तिला आताही म्हणतो की, तुला हॉलीवूडमध्ये जाऊन करिअर करायचं असेल, तर तू जा. मी येणार नाही.”

त्याबद्दल अधिक बोलताना उमेश कामत म्हणाला, “मजेचा भाग नाही. मी यावर विचार करायला लागलो. मी मुंबईबाहेर कुठे राहायला गेलो, दोन दिवस जरी कुठे बाहेर गेलो आणि पुन्हा मुंबईत आलो, तर मला छान श्वास घेता येतो.”

उमेश कामत मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल म्हणाला…

उमेश कामत मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल म्हणाला की, मी ट्रॅफिकमध्ये अजिबात चिडचिड करत नाही. त्याचं कारण म्हणजे एका पॉईंटनंतर आपण चिडचिड करून काहीच करू शकत नाही.

प्रिया बापट उमेशच्या वक्तव्यावर म्हणाली की, स्वत:चे आई-वडील, मित्रमंडळ सोडून तो जाऊच शकत नाही. दरम्यान, प्रिया व उमेश यांची हे काय नवीन ही वेब सीरिज ३१ मार्च रोजी प्रदर्शित झाली आहे.