अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाने सायकोलॉजिकल थ्रिलरची संकल्पनाच बदलली. या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की नंतर त्याचा सिक्वेलही आला. जर तुम्ही अशा थ्रिलर सिनमांचे चाहते असाल, तर आम्ही तुम्हाला एका रंजक चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
अजय देवगण आणि श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जबरदस्त कथा, चित्रपटातील संवाद आणि दृश्ये आजही चर्चेत असतात. ‘दृश्यम’नंतर एक वर्षाने २०१६ मध्ये, एक सायको-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात आताचे दोन सर्वात मोठे स्टार झळकले होते. या चित्रपटात असे अनेक ट्विस्ट आहेत, जे तुम्हाला शेवटपर्यंत चित्रपट पाहण्यास भाग पाडतात.
‘रमन राघव 2.0’ ची कथा
या सायको थ्रिलर चित्रपटाचं नाव ‘रमन राघव 2.0’ आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स असलेल्या सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तेव्हा तो मोठा स्टार झाला नव्हता. ‘रमन राघव 2.0’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने सिरियल किलर रमनची भूमिका केली होती. जो रात्री महिलांना मारायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. विकी या चित्रपटात एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होता.
विकी एसीपी राघवनच्या भूमिकेत होता. तो आरोपी रमनला पकडण्याचा प्रयत्न करतो. रमन पोलिसांसमोर सरेंडर करतो आणि त्याने नऊ जणांची हत्या केल्याची कबुली देतो. मग पोलीस त्याला तुरुंगात टाकतात. पण रमन तुरुंगातून पळून जातो, तो त्याच्या बहिणीच्या घरी जातो. तिथे तो त्याची बहीण, तिचा पती आणि मुलाला मारतो. त्यानंतर तो पुन्हा मुलींचे खून आणि बलात्कार करण्याचा कट रचतो.
रमन नंतर राघवनची प्रेयसी सिमीच्या घरी पोहोचतो. त्याला दोघांच्या नात्याबद्दल समजतं. या काळात रमनला पुन्हा पोलीस पकडतात. त्याला अटकहोते, पण तो पुन्हा पळून जातो. सिनेमात सिमीची भूमिका सोभिता धुलिपालाने केली आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये रमन आणि राघवन यांच्यातील संघर्ष दाखवला जातो.
‘रमन राघव 2.0’ चा क्लायमॅक्स चक्रावून टाकणारा आहे. चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. या सिनेमाचे आयएमडीबी रेटिंग ७.३ आहे. अनुराग कश्यपने ३.५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘रमन राघव 2.0’ झी5 वर उपलब्ध आहे.
