Thalapathy Vijays best social & political movies on OTT : विजयचे चित्रपट नेहमीच मनोरंजन आणि अर्थपूर्ण कथानक यांचा समतोल राखतात. भ्रष्टाचार, आरोग्य, शेती आणि महिलांचे हक्क अशा विषयांवर त्याच्या चित्रपटांतून वारंवार भाष्य केलं जातं, जे सामान्य लोकांच्या आयुष्यातील मुद्द्यांशी जोडलेले असतात. विजय सध्या निवडणुकांमुळे चर्चेत आहे. पण, त्याचे हे चित्रपट त्याच्या विचारांची आणि अभिनय ते राजकारणातील प्रवासाची झलक दाखवतात.
विजयचा पदार्पणातील चित्रपट ‘नालय्या थीरपू’ (Naalaiya Theerpu) बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, पण म्हणतात ना यशाची पहिली पायरी ही अपयश असतं असंच काहीसं विजयबरोबर झालं. कारण यानंतरचे त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरला आणि तो तमिळनाडूमधील सुपरस्टार बनला. म्हणून आम्ही तुम्हाला सध्या राजकारण आणि निवडणूक यामुळे चर्चेत असलेला विजयच्या अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामधून त्याने अनेकांचं लक्ष वेधलं आणि ते तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.
ओटीटीवर पाहा समाजिक गोष्टींवर भाष्य करणारे विजयचे ‘हे’ चित्रपट
सरकार – ‘सरकार’ हा एक प्रभावी राजकीय ड्रामा असलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये निवडणुकीतील भ्रष्टाचार आणि एका मताची ताकद किती असते हे दाखवलं आहे. विजयने या चित्रपटात एका मोठ्या कॉर्पोरेट लीडरची भूमिका साकारलीये, जो भारतात परत येऊन चुकीच्या मतदान व्यवस्थेचा पर्दाफाश करतो. मतदारांचे हक्क आणि जबाबदारी यावर प्रकाश टाकल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
Mersal – हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच सामाजिक विषयांवर भाष्य करतो. आरोग्य व्यवस्थेतील समस्या या चित्रपटात दाखवल्या आहेत. विजयने दुहेरी भूमिका साकारत वाढते वैद्यकीय खर्च आणि उपचारांमधील असमानता यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या मुद्द्यांवर मोठी चर्चा झाली होती. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, झी ५ आणि नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Kaththi – हा विजयच्या सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या जमिनीवर होणारे कॉर्पोरेट शोषण यांसारखे गंभीर विषय दाखवले आहेत. या चित्रपटामुळे ग्रामीण भागातील समस्या मुख्य प्रवाहातील सिनेमात आल्या आणि हा त्याच्या सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट तुम्ही घरबसल्या झी ५, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
Thuppakki – हा मुख्यतः अॅक्शन थ्रिलर चित्रपट असला तरी त्यामध्ये देशाच्या सुरक्षेबद्दल आणि दहशतवादाविरोधात सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे. विजयने यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली असून देशभक्ती आणि नागरिकांची जबाबदारी यावर भर दिला आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि एम एक्स प्लेअरवर पाहू शकता.
मास्टर – या चित्रपटात बालसुधारगृहांच्या व्यवस्थेचा प्रभाव आणि गुन्हेगारीचा तरुणांच्या मनावर होणारा परिणाम दाखवला आहे. यामधून भूमिकेतून व्यवस्थेतील त्रुटी, तसेच योग्य मार्गदर्शन (मेंटॉरशिप) आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे सूक्ष्मपणे मांडलं आहे. हा सिनेमा तुम्ही झी ५वर आणि यूट्यूबवर पाहू शकता.
Bigil – हा चित्रपट फक्त क्रीडापटूंची कथा नसून महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देतो. महिला खेळाडूंना समाजात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे यात दाखवले आहेत. विजयने यामध्ये दुहेरी भूमिका साकारत लैंगिक समानता आणि क्रीडाक्षेत्रात योग्य पाठबळ किती गरजेचं आहे, हे दाखवलं आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
