Vir Hirani on Arshad Warsi: काही कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. काही वेब सीरिज, चित्रपट, नाटक धुमाकूळ घालतात. सध्या अशीच एक वेब सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. प्रीतम अँड पेड्रो असे या सीरिजचे नाव आहे. सहा भागांच्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
राजकुमार हिरानी यांनी याचे लेखन केले आहे, तसेच निर्मितीदेखील केली आहे. त्यांचा मुलगा वीर हिरानी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसला आहे. त्याच्याबरोबर अर्शद वारसी, विक्रांत मेस्सी, मोना सिंग, श्रुती मराठे, भारत गणेशपुरे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले आहेत. प्रत्येक कलाकाराचे पात्र लक्ष वेधून घेत आहे.
वीरने प्रीतम ही भूमिका साकारली आहे, तर पेड्रोच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसला आहे. विक्रांत मेस्सीने मार्टिन ही भूमिका साकारली असून श्रुती मराठेने श्रद्धा ही भूमिका साकारली आहे. भारत गणेशपुरे क्रीडामंत्र्यांचा पीए साठेच्या भूमिकेत आहेत, तर मोना सिंग स्टेसीच्या भूमिकेत दिसत आहे.
सीरिजमध्ये प्रीतम आणि पेड्रोची मैत्री पाहायला मिळते. मार्टिनचा राग पाहायला मिळतो. स्टेसीचं मुलगा वारल्याचं दुःख पाहायला मिळतं. मुलाला शोधण्यासाठीची क्रीडामंत्र्यांची धडपड दिसते. श्रद्धामुळे गोष्टीत काही ट्विस्ट येतात.
“तुम्ही सतत मला…”
सध्या या सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना अर्शद वारसीसाठी वीर हिरानीने एक खास पोस्ट लिहिली आहे. वीरने अर्शदबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिले, “प्रिय अर्शद सर, माझ्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये काम करताना माझ्या मनात उत्सुकता होती, पण त्याचबरोबर भीती वाटत होती. मात्र, तुम्ही माझ्याबरोबर होता, त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या.”
पुढे त्याने लिहिले, “तुम्ही सतत मला मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. तुम्ही दिलेली प्रत्येक सूचना ही माझी आयडिया आहे असं मला वाटू लागलं. अगदी पेड्रोप्रमाणेच तुम्ही कधीच त्याचं श्रेय घेतलं नाही.”
शेवटी त्याने असेही लिहिले, “सध्या प्रीतम अँड पेड्रोला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. मी भाग्यवान आहे की अगदी पहिल्या दिवसापासून मला तुमच्याकडून तितकंच प्रेम मिळत होतं, लव्ह यू सर”, असे लिहित त्याने अर्शद वारसीबद्दल प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. या पोस्टमधून त्यांच्यातील बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
वीरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. श्रुती मराठेने क्युटेस्ट जोडी असे लिहित त्यांचे कौतुक केले आहे, तर चाहत्यांनी आम्हाला प्रीतम अँड पेड्रोचा दुसरा सीझन पाहायचा आहे असे लिहिले आहे.



वीर आणि अर्शदने पहिल्यांदाच एकत्र काम केले नाही, तर वीरने ‘मुन्नाभाई MBBS’मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. दरम्यान, प्रीतम अँड पेड्रो ही वेब सीरिज जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. आता आगामी काळात याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
