Premium

Who Is Your Gynac : मासिक पाळी, सेक्स लाइफ ते बाळंतपण; महिलांच्या समस्यांवर भाष्य करणारी सीरिज

Who Is Your Gynac : महिलांचं आरोग्य आणि स्त्रीरोगतज्ज्ञाचं महत्त्व अधोरेखित करणारी सीरिज

who is your gynac review
who is your gynac review : महिलांच्या समस्यांवर भाष्य करणारी सीरिज

आपण आपल्या मैत्रिणींना हजारो प्रश्न विचारतो पण, तुम्ही कधी ‘Who Is Your Gynac?’ असं तुमच्या मैत्रिणीला विचारलंय का? स्त्रियांची मानसिकता, त्यांचे हक्क, त्यांना नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या याबद्दल अलीकडच्या काळात मनमोकळेपणाने संवाद साधला जातो. अनेकदा विविध सत्र आयोजित केली जातात आणि यापेक्षा एक पाऊल पुढे जात आता व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे नवं माध्यम आहेच. पण, या पलीकडे जात महत्त्वाचं असतं ते प्रत्येक महिलेचं आरोग्य!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला दारुच्या दुकानात गेल्यावर जेवढी चर्चा होत नसेल, तेवढी चर्चा एखादी महिला स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेल्यावर होते. स्त्रीरोगतज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर समस्या असणार असा समज बायकाच बायकांबद्दल करून घेतात. महिलांच्या पार्ट्यांमध्ये गॉसिप केलं जातं, अगदी मासिक पाळीच्या तारखा विचारण्यापर्यंत आज आपण पुढारलेले आहोत. पण त्या पलीकडच्या शारीरिक समस्यांकडे स्त्रिया सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात. एकंदर काय, तर स्त्रियांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता करणं हा एक मोठा विषय आहे. स्त्रिया त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल पुरुष तर दूरचं राहिले पण, अगदी महिला डॉक्टरशी संवाद साधण्यास सुद्धा संकोच बाळगतात, ज्यामुळे कधीकधी परिस्थिती अधिक बिघडते. स्त्रीआरोग्य या काहीशा गंभीर विषयावर हलक्या फुलक्या पद्धतीने भाष्य करणारी सीरिज म्हणजे ‘Who Is Your Gynac?’

हेही वाचा : स्त्रीमनाचे कवडसे..

हिमाली शाह दिग्दर्शित या सीरिजचं संपूर्ण कथानक डॉ. विदुषी कोठारीभोवती फिरतं. या विदुषीची भूमिका सबा आझादने साकारली आहे. तिने नुकतीच स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. इतर बाह्य गोष्टींमध्ये वाहून न जाता ही सीरिज शेवटपर्यंत तुम्हाला कथानकाशी जोडून ठेवते. या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये एकूण पाच भाग आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना अमेझॉन मिनी टिव्हीवर पाहता येणार आहे.

डॉ. विदुषीकडे सीरिजच्या पहिल्या भागात २१ वर्षांची मुलगी वेळेवर मासिक पाळी येत नसल्याची समस्या घेऊन येते. यानंतर दुसऱ्या भागात विदुषीकडे एक विवाहित जोडपं येतं. या दोन्ही स्त्रिया त्यांच्या समस्या डॉ. विदुषीला मनमोकळेपणाने सांगत नाहीत हे तिला पटकन जाणवतं. अर्थात आजच्या पिढीला बोलतं कसं करायचं याची उत्तम जाणं असलेली डॉ. विदुषी या दोघींकडून अनेक गोष्टी जाणून घेते. मासिक पाळी वेळेत न येणं, लग्नानंतर सेक्स लाइफ याविषयी त्या दोघींशी मनमोकळेपणाने चर्चा करुन विदुषी त्यांना उपाय आणि उपचार घेण्यास सुचवते. यानंतरच्या भागात तिच्याकडे काही शाळकरी मुली वैयक्तिक समस्या घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं आहे. या मुलींच्या शंकांचं त्यांच्या पालकांनी निरसण न केल्यामुळे त्यांना विदुषीच्या सल्ल्याचा गुपचूप आधार घ्यावा लागतो. हे आजच्या काळातील वास्तव या सीनद्वारे दाखवण्यात आलं आहे. महिलांच्या योनी विषयक व लैंगिक समस्या, नातेवाईकांकडून मिळणाऱ्या असंख्य सल्ल्यांमध्ये जखडून गेलेली स्वरा ही गरोदर मैत्रीण यामधून विदुषी कशी मार्ग काढते हे पाहणं शेवटपर्यंत खूपच रंजक वाटतं.

हेही वाचा : विक्रम गोखले यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट ‘सूर लागू दे’लवकरच रुपेरी पडद्यावर

डॉ. विदुषीची तिच्या रुग्णांप्रती असलेली आपुलकी पाहून तिची जवळची मैत्रीण स्वरा, गरोदरपणात मोठ्या नावाजलेल्या डॉक्टरला डावलून स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून विदुषीची निवड करते. स्वराच्या रुपात डॉ. विदुषीला तिची पहिली डिलिव्हरी केस मिळते. या सीरिजच्या पहिल्या सीझनचे पाचही भाग जवळपास २० मिनिटांचे आहेत. त्यामुळे कोणताच भाग पाहताना कंटाळवाणा वाटत नाही. अर्थात सीरिजमध्ये डॉ. विदुषी ही भूमिका सबाने अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे.

अनुया जकातदार, प्रेरणा शर्मा आणि गिरीश नारायणदास यांचं दमदार लेखन हा या सीरिजचा मुख्य गाभा आहे. विदुषी व्यतिरिक्त या सीरिजमध्ये तिचे दोन जवळचे मित्र स्वरा आणि मेहेर ही दोन महत्त्वाची पात्रं आहेत. ९ महिने उपचार घेतलेली महिला जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हाच स्त्रीरोगतज्ज्ञाला पूर्णत्व आल्यासारखं वाटतं. बाळाच्या जन्मानंतर तो भाव आणि आनंद विदुषीच्या चेहऱ्यावर अंतिम भागात पाहायला मिळतो. हलकी-फुलकी पण तेवढीच प्रभावी उदाहरणं देत ही सीरिज महिलांचं लैंगिक आरोग्य आणि त्याबद्दलचं शिक्षण यावर हळुवार प्रकाशझोत टाकते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is your gynac review highlight importance of gynecologist and women health issue staring saba azad sva 00

First published on: 26-11-2023 at 09:40 IST
Next Story
अखेर ठरलं! ‘मनी हाईस्ट’ची बहुचर्चित स्पिन-ऑफ सीरिज ‘बर्लिन’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी ते जाणून घ्या