Marathi Actor Shares Memory Of Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे नाना त्यांच्या स्वभावानेसुद्धा अनेकांना आपलंसं करतात. अनेकदा ते सेटवर आपल्या हातांनी सहकलाकारांना जेवण खाऊ घालतात.
नाना पाटेकर हे स्पष्टवक्ते आहेत. एखाद्याबद्दलचं मत ते अगदी मोकळेपणाने व्यक्त करतात. त्याचबरोबर एखाद्याच्या कामाचे कौतुकसुद्धा ते तितक्याच आपलेपणाने करतात. नाना पाटेकरांबरोबर काम केलेल्या अनेकांनी त्यांच्या साध्या स्वभावाचे कौतुक केले आहे. अशातच एका मराठी अभिनेत्याने नाना पाटेकरांची जुनी आठवण शेअर केली आहे.
नाना पाटेकरांचा ‘पक पक पकाक’ हा लोकप्रिय सिनेमा आठवतोय का? त्या सिनेमात अभिनेते विजय पटवर्धन यांनी शिक्षकांची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर नाना पाटेकर आणि विजय पटवर्धन यांची भेट झाली नव्हती. पण त्यानंतर काही वर्षांनी नाना पाटेकरांनी विजय पटवर्धन यांना भेटल्यानंतर त्यांचे कौतुक केले होते.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विजय पटवर्धन यांनी ही आठवण सांगितली. ते म्हणाले, “‘पक पक पकाक’ सिनेमात नाना पाटेकरांबरोबर काम करता आलं. माणूस म्हणून कसे वागलो पाहिजे हे त्यांच्याकडून शिकता आलं. सेटवर आपली वर्तणूक कशी असावी हे सगळं शिकता आलं. नाना पाटेकरांबरोबर माझा एकच सीन आहे. इतर वेळेसही सीन होते. तेव्हा ते आमच्याबरोबर हसत खेळत असायचे गमती जमती करायचे. पण त्यांनी एकत्र काम केल्याचे अनेक वर्षे लक्षात ठेवलं होतं.”
“‘पक पक पकाक’नंतर अनेक वर्षांनी नाना पाटेकरांचा ‘नटसम्राट’ सिनेमा आला होता. त्या सिनेमाच्या प्रीमियर शोच्या दिवशी आम्ही सिटी प्राइड कोथरूड येथे दुपारचा शो पहायला गेलो होतो. आमचा शो संपल्यानंतर आम्ही खाली उतरत होतो आणि तेव्हाच नाना पाटेकर वर येत होते. मला बघितल्यानंतर अरे मास्तर… काय करतोयस इकडे? असं विचारलं. ते ऐकून मला धक्काच बसला. १९९७-९८ च्या दरम्यान ‘पक पक पकाक’चं शूटिंग झालं असेल आणि पुढे किती वर्षांनी ‘नटसम्राट’ सिनेमा आला होता. इतकी वर्षे झाल्यानंतरदेखील नाना पाटेकरांनी मला ‘पक पक पकाक’मधील मेकअपशिवाय ओळखलं होतं आणि इतरांनाही सांगितलं होतं की, हा मास्तर आठवतोय का? ‘पक पक पकाक’मध्ये त्याने उत्तम काम केलं होतं. हे ऐकताच मला रडायला आलं होतं. या एवढ्या मोठ्या माणसाने मला लक्षात ठेवलं होतं आणि माझ्या कामाचं कौतुक केलं होतं”, असंही ते म्हणाले.
शेवटी विजय म्हणाले, “मी त्यांच्याकडून शिकलो की, माणूस समोर आल्यानंतर त्याचं आणि त्याच्या कामाचं कौतुक करावं. ‘पक पक पकाक’च्या प्रीमियरला मी जाऊ शकलो नव्हतो आणि त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. पण तरी इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. हा त्या माणसाचा मोठेपणा आहे.”
