राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी, २३ जून रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित दुसऱ्या नागरी सत्कार समारंभात उर्वरित पद्म पुरस्कार प्रदान केले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी पाहुयात…
ज्येष्ठ पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या काही काळापासून अलका यांना कानाची समस्या आहे, त्यामुळे त्यांना ऐकण्यास अडचण येतेय, त्यांना एका सहाय्यकाने मंचापर्यंत नेलं. मंचावर जाण्यापूर्वी त्यांनी पहिल्या रांगेत बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मामूटी यांना राष्ट्रपतींनी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. या प्रसंगी त्यांची पत्नी सुल्फाथ, मुलगा-अभिनेता दुलकर सलमान आणि मुलगी सुरुमी हे देखील उपस्थित होते.
तेलुगू अभिनेते मुरली मोहन आणि राजेंद्र कुमार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
अभिनेता आर. माधवन यालाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंचावर जाण्यापूर्वी त्याने पंतप्रधान मोदींना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
दिवंगत अभिनेते सतीश शाह, यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांचे चुलत भाऊ अरविंद मामानिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण
२६ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या नागरी सत्कार समारंभात राष्ट्रपतींनी एकूण ६६ पद्म पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला होता. या सोहळ्यात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, ज्यांचे नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झाले होते, त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांची पत्नी, अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला.
जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी नीता पांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रॉसेनजीत चॅटर्जी यांनाही या सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षी ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पद्म पुरस्कार २०२६: सन्मानित व्यक्तींची पूर्ण यादी
पद्मविभूषण २०२६ चे विजेते
धर्मेंद्र सिंह देओल (मरणोपरांत) — कला (महाराष्ट्र)
के. टी. थॉमस — लोक सेवा (केरळ)
एन. राजम — कला (उत्तर प्रदेश)
पी. नारायणन — साहित्य आणि शिक्षण (केरळ)
वी. एस. अच्युतानंदन (मरणोपरांत) — लोक सेवा (केरळ)
पद्मभूषण २०२६ चे विजेते
अलका याज्ञिक — कला (महाराष्ट्र)
भगत सिंह कोश्यारी — लोक सेवा (उत्तराखंड)
कल्लिपट्टी रामासामी पलानीस्वामी — वैद्यकीय (तमिळनाडू)
मामूटी — कला (केरळ)
डॉ. नोरी दत्तात्रेयुडु — वैद्यकीय(अमेरिका)
पीयूष पांडे (मरणोपरांत) — कला (महाराष्ट्र)
एस. के. एम. मैलानंधन — समाज सेवा (तमिळनाडू)
शतावधानी आर. गणेश — कला (कर्नाटक)
शिबू सोरेन (मरणोपरांत) — लोक सेवा (झारखंड)
उदय कोटक — व्यापार आणि उद्योग (महाराष्ट्र)
व्ही. के. मल्होत्रा (मरणोपरांत) — लोक सेवा (दिल्ली)
वेल्लापल्ली नटेशन — लोक सेवा (केरळ)
विजय अमृतराज — खेळ (अमेरिका)
