संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’चा ट्रेलर आणि त्यानंतर प्रदर्शित झालेले घूमर गाणे याच्या यशानिमित्त अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच एक पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक नावाजलेल्या कलाकारांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या पार्टीतले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी दीपिकाच्या एका फोटोवर साऱ्यांचीच नजर खिळली.

या फोटोमुळे ती आता चांगलीच ट्रोलही झाली आहे. अरमान जैनने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या फोटोमध्ये दीपिका अरमान आणि तिच्या अजून एका मित्रांच्या खांद्यावर हात टाकून उभी आहे. या फोटोत अरमानच्या हातात एक ग्लास दिसत असून दीपिकासुद्धा काहीशी नशेत असल्यासारखी वाटते. यावरून आता दीपिकाला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. ती पूर्ण मद्यधुंद अवस्थेत असून फार विचित्र दिसत असल्याचे एका युजरने कमेंटमध्ये म्हटले गेले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, मला दीपिका फार आवडते. पण गेल्या काही  दिवसांमध्ये ती खूप विक्षिप्त वागत आहे. तिच्या आगामी सिनेमासाठी तिला शुभेच्छा.

दीपिकाचे मद्यधुंद अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे मद्यधुंद अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहरसोबतचा तिचा मद्यधुंद अवस्थेतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘पद्मावती’ सिनेमा दीपिका राणी पद्मिनी, शाहिद कपूर महारावल रतन सिंह आणि रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या तिन्ही भूमिकांचा फर्स्ट लूक असो किंवा सिनेमाचा ट्रेलर किंवा दीपिकावर चित्रीत करण्यात आलेले ‘घुमर’ हे गाणे असो, प्रत्येक गोष्टीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘घुमर’ हे गाणे प्रेक्षकांना फार आवडले असून अल्पावधीत या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले.

‘पद्मावती’ सिनेमाच्या थ्रीडी ट्रेलर प्रदर्शनानंतर रणवीरने काही ट्विट्स केले, ज्यावरून दीपिका आणि त्याच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होऊ लागलेली. मात्र, दीपिकाच्या पार्टीला सर्वांत आधी पोहोचून बॉलिवूडच्या ‘बाजीराव’ने दीपिकासोबतचे त्याचे नाते मजबूत असल्याचे दाखवून दिले.