Padmini Kolhapure Asha Bhosle Relation: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांच्या करिअरची सुरुवातच आशाताईंमुळे झाली. “आशा आत्याने माझी ओळख देव आनंद यांच्याशी करून दिली आणि मला माझा पहिला चित्रपट मिळाला,” अशी आठवण त्यांनी सांगितली. आशाताईंच्या साधेपणाचे कौतुक करताना पद्मिनी म्हणाल्या की, त्या दिवाळीला नेहमी भेटवस्तू घेऊन यायच्या. ‘माई’ चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी पद्मिनीचीच अट घातली होती, हा किस्साही त्यांनी शेअर केला. तसेच, त्यांना वडिलांच्या हातचे ‘मुगा मोले रांदई’ हे सारस्वत जेवण किती प्रिय होते, हे सांगताना पद्मिनी भावूक झाल्या.
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि दिवंगत गायिका आशा भोसले एकमेकांच्या नातेवाईक आहेत. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माई’ आशाताई व पद्मिनी दोघींनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाद्वारे आशाताईंनी वयाच्या ७९ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
आशा आत्या म्हणून हाक मारायच्या पद्मिनी कोल्हापूरे
आशा भोसलेंच्या निधनानंतर पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आशा आत्याने माझी ओळख देव आनंद यांच्याशी करून दिली होती, त्यामुळे मला माझा पहिला चित्रपट ‘इश्क इश्क इश्क’ (१९७४) मिळाला होता. मी त्यांना ‘आशा आत्या’ म्हणायचे. मला आठवतंय, लहानपणी त्या प्रत्येक दिवाळीला त्या भेटवस्तूंनी भरलेली पिशवी घेऊन आमच्या घरी यायच्या.”
आशाताईंनी ‘माई’ चित्रपटात काम करण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल सांगताना ६० पद्मिनी म्हणाल्या, “मला आठवतंय ‘जर या चित्रपटात पद्मिनी असेल, तरच मी हा चित्रपट करेन’, असं आशा आत्याने म्हटलं होतं. “
पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्यावर चित्रित झालेली आणि आशाताईंनी गायलेली त्यांची काही आवडती गाणी सांगितली. त्या म्हणाल्या, “कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता (आहिस्ता आहिस्ता), पूछो ना यार क्या हुआ (जमाने को दिखाना है, १९८१), अनाड़ी का खेलना (वो ७ दिन) यासह अनेक गाणी मला फार आवडतात.”
“त्यांच्या मागील वाढदिवसाला त्यांनी मला आणि पूनम ढिल्लोंला त्यांच्या कपाटात जपून ठेवलेल्या साड्या भेट दिल्या होत्या. त्यांना गोव्याच्या किनारपट्टी भागातील ‘मुगा मोले रांदई’ हा सारस्वत पदार्थ खूप आवडायचा. खासकरून माझ्या वडिलांनी बनवलेला हा पदार्थ त्या खूप आवडीने खायच्या,” असं म्हणत पद्मिनी कोल्हापूरे यांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिला.
आशा भोसले व पद्मिनी कोल्हापूरे यांचं नातं
पद्मिनी कोल्हापूरेंचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर, आशा भोसले यांचे चुलत भाऊ होते. आशा भोसले पद्मिनी कोल्हापुरेंच्या आत्या होत्या. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लता मंगेशकर यांची नात आहे. श्रद्धाचे आजोबा हे शास्त्रीय गायक होते.
