प्रेक्षकांचं निव्वळ चार घटका मनोरंजन करणं हा संतोष पवार यांचा फंडा आहे. त्यांची बहुसंख्य नाटकं याच कॅटेगरीतली असतात. नुकतंच रंगमंचावर आलेलं स्वप्नील बारस्कर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित ‘पहिली लग्नाची, दुसरी प्रेमाची’ हे नाटकही याच पठडीतलं आहे. डोकं बाजूला ठेवून दोन-सव्वादोन तास धमाल करमणूक करणारं.

या नाटकाचं कथाबीज तसं बिलकूलच नवं नाहीए. मोहन या गृहस्थाची बायको- स्वाती मरण पावलेली आहे. पण तरीही ती नवर्‍यावर सदानकदा पहारा देत असते. त्याचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून ती सतत त्याच्यावर खेकसत, डाफरत असते. मोहनही तिला घाबरून असतो. अर्थात ती फक्त त्यालाच दिसत असते.

मोहनला एक लग्नाळू मुलगी आहे- अदिती. तिचं लग्न त्यानं अमेरिकेतल्या एका मुलाशी ठरवलंय.

दरम्यान एकदा मोहन लेकीबरोबर मॉलमध्ये गेलेला असताना विहान नावाच्या तरुणाशी त्यांची गाठ पडते. तो फंकी युवक असतो. नवनव्या मुलींबरोबर फ्लर्ट करण्यात त्याला मौज वाटत असते. तिथं त्याची थोडीशी मोहनशी झकाझकी होते. तेवढ्यात विहानची आई- प्रणोती तिथं येते आणि मोहनला धक्काच बसतो. ती त्याची कॉलेजमधली क्रश निघते. कर्मधर्मसंयोगानं अचानक भेटलेल्या प्रणोतीची मोहन विचारपूस करतो. तेव्हा ती या शहरात नुकतीच आलेली आहे आणि भाड्याने जागा शोधते आहे असं त्याला कळतं. तिचाही नवरा काही वर्षांपूर्वी गेलेला असतो.

मोहन त्यांना भाड्याने जागा मिळेपर्यंत आपल्या घरी राहण्याची ऑफर देतो. खरं तर अदितीला हे तितकंसं पसंत नसतं. स्वातीलाही नवर्याचं असं मैत्रिणीला घरात थारा देणं बिलकूल आवडत नाही. ती त्यावरून बराच थयथयाट करते. पण ती त्याबद्दल प्रत्यक्षात काहीच करू शकत नाही हे मोहन जाणून असतो. मोहनला प्रणोती आवडते हे आधी अदितीला पसंत नसतं. पण आपल्या लग्नानंतर ते अगदीच एकटे पडतील हा विचार करून ती प्रणोतीच्या रूपात आपल्या वडलांना कम्पॅनियन मिळेल असा विचार करून हळूहळू त्यांच्या जवळिकेला प्रोत्साहन देते.

काही काळाने अदितीही विहानच्या प्रेमात पडते. अर्थात ते मोहनला मान्य नसतं. या उडाणटप्पू मुलाशी आपल्या अदितीचं लग्न व्हावं हे त्याला बिलकूलच मंजूर नसतं. पण विहान त्याला दारूच्या नशेत मनवतो आणि लग्नाला परवानगी मिळवतो. अदिती मोहन आणि प्रणोतीचं जुळावं या खटपटीत असतेच. मात्र, स्वाती नवर्याच्या या क्रशला घरातून घालवून देण्यासाठी आकाश-पाताळ एक करते. विहानलाही आईने मोहनला जवळ करावं हे बिलकूल मान्य नसतं.

या सगळ्या धूमशान काल्याचा शेवट काय होतो हे प्रत्यक्ष नाटकात बघणंच योग्य.

लेखक स्वप्नील बारस्कर यांनी या चिरपरिचित कथाबीजाची विनोदी अवगुंठनात धमाल मोट बांधली आहे. क्षणभरही प्रेक्षकांना विचार करायला वेळ मिळणार नाही याची खबरदारी घेत त्यांनी नाटकाची गतिमान रचना केली आहे. आपल्या हाती भाऊ कदम हा हुकमाचा एक्का आहे याची जाणीव सतत त्यांनी ठेवली आहे. त्यामुळे नाटकात एकही क्षण डल जात नाही. विरोधाभासी विचार आणि कृती यांच्यातून हास्याचे फवारे फुटतात.

दिग्दर्शक संतोष पवार यांची विनोदावरची हुकूमत त्यांनी इथे पणाला लावली आहे. छोट्या छोट्या घटना-प्रसंगांत विनोद कसा बाहेर काढायचा यात त्यांची मास्टरी आहे. आणि त्यांनी याचा पुरेपूर वापर यात केला आहे. भाऊ कदम यांच्यावरच या नाटकाची भिस्त आहे हे ओळखून त्यांनी त्यांना अक्षरश: बागडायला मुक्तद्वार दिलं आहे. त्यांची लकब, देहबोली, शब्दफेक, गाण्याचं अंग या सगळ्यांचाच त्यांनी मनमुराद वापर केला आहे. मात्र, इतर पात्रं त्यामानाने नैसर्गिकतेनं वावरतात… वागता-बोलतात. त्यातूनही विनोद घडतो. मात्र, स्वाती हे पात्र काहीसं आक्रस्ताळं असलं तरी ते फारसं यात काही कॉन्ट्र्युबुट करत नाही. दिग्दर्शकाने क्षणभरही प्रेक्षकांना मोकळं न सोडता सतत हास्याचे स्फोटावर स्फोट होत राहतील हे पाहिलं आहे. त्यासाठी पात्रांच्या परस्पर नात्यांंच्या समीकरणातले तिढेही त्यांना उपयोगी पडले आहेत. शिवाय भाऊ कदम हे मोहनच्या रूपात वरून कितीही भोळसट दिसत असले तरी अंगी नाना कळा असलेले हुकमी एक्के आहेतच हाताशी. त्यांचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे.

नेेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी मोहनचं घर आणि मॉल वगैरे वास्तवदर्शी आणि सांकेतिक स्वरूपात साकारले आहेत. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून घटना-प्रसंगांना उठाव दिला आहे. साई-पियुष यांची गीते आणि संगीत श्रवणीय. हास्या पवार यांनी भाऊ कदम यांना दिलेली वेशभूषा त्यांच्या बदलत्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी. राजेश परब यांची रंगभूषा पात्रांना चेहरा प्रदान करते. भाऊ कदम यांचा हरहुन्नरी, पण वरकरणी भोळसट असल्याचा आव आणणारा मोहन नाटकात अशक्य धूडगूस घालतो. त्यांची विनोदातील उपजत उत्स्फूर्तता आणि सहजभाव दाद देण्याजोगाच. त्यांंना गाण्याचं उत्तम अंग असल्याचं यात प्रकर्षानं जाणवतं.

हे नाटक त्यांनी एकहाती आपल्या खांद्यावर पेललंय असं म्हटल्यास वावगं ठरू नये. शब्दफेकीवरची त्यांची जबरदस्त हुकूमत तर लाजवाबच. त्यातून खळाळणारा विनोद घडतो. पूनम सरोदे-परब यांची अदितीच्या भूमिकेतील लवचिकता आणि विविध भावदर्शन लक्षवेधी. मैथिली वारंग यांची प्रणोती ‘हॅपी गो लकी’ प्रकारातली वाटते. सुजाता किरण यांनी वठवलेली स्वाती अनावश्यक आक्रस्ताळी भासते. या पात्राला अन्य कसलेही कंगोरे नाहीत. हे पात्र नाटकात फारसं कॉन्ट्र्युबूटही करीत नाही. कारण मोहन सतत तिच्या दहशतीखाली आहे असंही जाणवत नाही… जे खरं तर यात अपेक्षित आहे. साकार देसाईंचा विहान ठाकठीक.